
सामना प्रतिनिधी। बीड
दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीड जिल्ह्यात दाखल होत आहेत. हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते मदतीचे वाटप केले जाणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेने महायज्ञ सुरू केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या बीड जिल्ह्यात दाखल होत आहेत. बीड शहरातील आशिर्वाद मंगल कार्यालयाच्या प्रांगणात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांना पशुखाद्य वाटप केले जाणार आहे. ग्रामीण भागातील काही गावांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत. दुष्काळाची पाहणी करणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि पुंडलिक खांडे यांनी केले आहे.
































































