
आंबेजोगाई तालुक्यातील होळ येथे आज गुरूवारी सायंकाळी पाच वाजता इनोव्हा आणि अॅपे रिक्षाची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने (एमएच 16 सीएन 700) होळ येथे अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षाच्या चिंधड्या झाल्या तर इनोव्हाच्या सर्व एअरबॅग उघडल्या गेल्या. या अपघातात रिक्षाचा चालक बालाजी संपती मुंडे (28 रा.पिसेगाव ता.केज), मच्छिंद्रसिंग चरणसिंग डोके (35) यांच्यासह तीन महिने आणि एक वर्षे वय असलेल्या दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या दोन महिला आणि दोन पुरूषांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. चालक वगळता इतर मृत आणि जखमी शिकलकरी समाजाचे असून एकाच कुटुंबातील आहे.


























































