
सामना प्रतिनिधी । बीड
लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त करा, शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामीनाथन आयोगातील तरतूदी तात्काळ लागू करा, शेतकरी हिताचे निर्णय घ्या, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 30 जानेवारी पासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करत आहेत. अण्णांच्या या आंदोलनाला सर्व तालुक्यांमधून पाठिंबा देणार असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.
बुधवार पासून अण्णांचे आंदोलन सुरू होत आहे. सरकारचे मध्यस्थीचे सर्व प्रयत्न फोल ठरले असून लोकपाल नियुक्तीसाठी सरकार का घाबरत आहे, असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार योग्य भूमिका घेत नसल्याची खंत अण्णांनी व्यक्त केली आहे.
कार्यकर्ते आणि जनतेतर्फे जास्तीत जास्त ग्रामपंचायतींपर्यंत निवेदने देऊन सरकारला आपली भूमिका कळविण्यात येईल. त्याप्रमाणे तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केले जातील. जनतेनेही या कामात सक्रिय सहभाग नोंदवून योग्य भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यास मदत होणार आहे.
अण्णांच्या आंदोलनाला युवक वर्ग आणि शेतकरी बांधवांनी पाठिंबा देऊन सरकारवरील दबाव वाढवावा. जनतेने मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी कार्यरत राहावे. यासाठी देशातील अनेक शेतकरी संघटनांनी अण्णांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवण्याची ग्वाही दिलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक संघटनांनी राळेगणसिद्धी येथे बैठकीला उपस्थिती लावून या मागण्यांसाठी सक्रीय आंदोलन करणार असल्याचे घोषित केले आहे.
सरकार लोकपाल आणून पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न का करत नाही, याचा जाब विचारावा, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले. तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आंदोलन काळात शांततेच्या मार्गाने जास्तीत जास्त आंदोलने करावित, असे आवाहन देखील देशमुख यांनी केले आहे.



























































