शेतकऱ्यांच्या ‘जलसमाधी’ आंदोलनाने प्रशासन ताळ्यावर, 4 दिवसात पाणी सोडण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प अंतर्गत बंद नलिका प्रणालीची डी. वाय. 3 ची मायनर एकला पाणी येत नसल्याने शेतकरी पाण्यावाचून वंचित राहत आहेत. त्यामुळे “धरण उशाला अन् कोरड घशाला” अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विनायक मुळे, दिनेश मस्के, अमरसिंह मस्के यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उर्ध्व कुंडलिका प्रकल्पात जलसमाधी आंदोलन केले. यामुळे प्रशासन ताळ्यावर आले असून चार दिवसात पाणी सोडू आश्वासन तहसीलदारांनी दिली आहे.

पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जल समाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’, ‘पाणी द्या, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले. वडवणीचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी सदरील शेतकऱ्यांना अवघ्या चार दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली.