
सीमाभागातील बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीने आणि शांततेत मतदान झाले. येथे 54.02 टक्के मतदान झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी 7 पर्यंत मतदानाची वेळ वाढवून दिल्याने, उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याचा अंदाज आहे.
भाजपचे दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या पोटनिवडणुकीत एकूण दहा उमेदवार रिंगणात होते. यामध्ये शिवसेनेने पाठिंबा दिलेले, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके, भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी आणि काँग्रेसकडून अश्लील सीडी प्रकरणातील तत्कालीन मंत्री रमेश जारकीहोळी यांचे बंधू, आमदार सतीश जारकीहोळी हे प्रमुख उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या प्रस्थापितांच्या विरोधात मराठी भाषिकांनी प्रथमच लोकसभेसाठी शुभम शेळके यांना उमेदवारी देऊन एकीची वज्रमूठ आवळली होती.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या जाहीर सभेने झंझावात निर्माण केला होता, तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधातील प्रचाराने भाजपचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आला, याचाही राग आज मतपेटीतून निघाला. शिवाय भाजपची घराणेशाही आणि भाजपच्या दुटप्पी धोरणावर खुलेआम टीका करत, कानडी बांधवांनी महाराष्ट्र एकीकरण समिताचे उमेदवार शुभम शेळके यांना मतदान केल्याचे सांगितले.




























































