
सामना प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राचे लाडके लेखक असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जीवनपटावर आधारित ‘भाईः व्यक्ती आणि वल्ली’ या चित्रपटाला महाराष्ट्रातच थिएटर मिळणे कठीण झाले आहे. ‘सिम्बा’ या हिंदी चित्रपटासाठी पुलंच्या बायोपिकला स्क्रीन देण्यास मुंबई आणि पुण्यातील थिएटर मालकांनी नकार दिला आहे. यामुळे मराठी सिनेरसिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
‘भाई’ सिनेमा उद्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. परंतु मुंबई आणि उपनगरांमध्ये 118 मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये ‘सिम्बा’ने पडदे अडवले आहेत. दक्षिण मुंबईतील 18, पश्चिम मुंबईत 20 आणि नवी मुंबईतील 7 अशा फक्त 45 सिनेमागृहांमध्येच ‘भाई’चे शो आहेत. पुण्यातही फक्त 17 सिनेमागृहांमध्ये ‘भाई’ दाखवण्यात येणार आहे. 28 डिसेंबरला प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्यामुळे ‘सिम्बा’ला जास्त स्क्रीन मिळाव्यात म्हणून वितरकही सिनेमागृहांच्या मालकांवर दबाव आणत असल्याची माहिती आहे.




























































