भांडूपमधील पालिकेच्या प्रसूतीगृहात लाईट गेल्याने गर्भवतीसह बाळाचा मृत्यू

मुंबईतील भांडुपमधील सावित्रीबाई फुले या पालिका प्रसूतीगृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची सिझेरियनची शस्त्रक्रीया सुरू असताना अचानक लाईट गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला. रुग्णालयात जनरेटर देखील काम करत नसल्यामुळे डॉक्टरांना टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रीया करावी लागली. मात्र या सगळ्या गोंधळात प्रसूतीला उशीर झाल्याने बाळाचा व आईचा दोघांचा मृत्यू झाला.

सोदीनिस्सा अंसारी असे त्या महिलेचे नाव असून तिला सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सुरुवातीला नॉर्मल डिलिव्हरी साठी प्रयत्न करण्यात आला. मात्र सोदीनिस्साची नॉर्मल ड़िलिव्हरी होत नसल्याने रात्री साडेबाराच्या सुमारास तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. तिथे तिची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात येणार होती. डॉक्टरांनी प्रसूतीला सुरुवात करताच अचानक रुग्णालयाची लाईट गेली. अचानक लाईट गेल्याने रुग्णालयात गोंधळ उडाला. जनरेटर देखील काम करत नसल्यामुळे डॉक्टरांना टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रीया करावी लागली. या सर्व प्रकारात त्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर सदर महिलेची देखील प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना शीव रुग्णालयात हलविण्यास सांगितले. सोदीनिस्साच्या नातेवाईकांनी तिला तत्काळ शीव रुग्णालयात नेले. मात्र तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुल दगावल्याचे समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. नातेवाईकांनी आरोप केला आहे की रुग्णालयात काही तासात चार ते पाच वेळा लाईट गेली होती. तसेच रुग्णालयातील जनरेटर देखील काम करत नव्हता. तरी देखील डॉक्टरांनी त्याच रुग्णालयात शस्त्रक्रीया करण्याचे ठरवले. डॉक्टर आम्हाला राजावाडी किंवा शीव रुग्णालयात पाठवू शकले असते मात्र त्यांनी तसे केले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.