
सामना ऑनलाईन । भुवनेश्वर
ओडिशामधील नक्षलग्रस्त मलकानगिरी जिल्ह्यात सोमवारी पहाटे सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे.
ओडिशामध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. याचदरम्यान मलकानगिरी जिल्ह्यातील कलिमेदा भागात नक्षलवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने सापळा रचला व पहाटे नक्षलवाद्यांना घेरले. जवान आल्याचे बघताच नक्षलवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. चार तास ही चकमक सुरू होती. यात पाच नक्षलवादयांना ठार करण्यात आले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात 30 ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. दंतेवाडा येथील अरणपूर भागात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू झाला होता. तर त्यााधी छत्तीसगडमधील बीजापूरमध्येही नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते.
ओडिशामध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात 18 जागांसाठी 12 नोव्हेंबरला तर 78 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे
























































