भुवनेश्वर कुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचला मोठा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदूस्थानचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा इतिहास रचला आहे. भुवनेश्वर कुमार हा आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पहिल्याच षटकात 14 बळी घेतले आहेत. या फॉरमॅटमध्ये कोणत्याही गोलंदाजाने त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेतलेल्या नाहीत. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडच्या सलामीवीराला बाद करताच भुवनेश्वर कुमार पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

भुवनेश्वर कुमारला स्विंगचा बादशाह म्हणणे देखील चुकीचे ठरणार नाही, कारण पहिल्या काही षटकांमध्ये त्याचा चेंडू इतका स्विंग होतो, की भले भले फलंदाज त्याला घाबरतात. जोस बटलर आणि जेसन रॉयसारख्या फलंदाजांना त्याचा चेंडू कोणत्या दिशेने जाईल हे समजत नाही. यामुळेच भुवनेश्वर कुमारने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे.

भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पहिल्या षटकात 14 बळी घेतले आहेत, तर डेव्हिड विलीने 13, अँजेलो मॅथ्यूजने 11, टीम साऊथीने 9 आणि डेल स्टेनने 9 विकेट्स घेतल्या आहेत. तर भारताकडून आर अश्विनने पहिल्याच षटकात सर्वाधिक 4 बळी घेतले आहेत.

क्रिकेट एक्सपर्टसच्या म्हणण्यानुसार भुवनेश्वर कुमार पहिल्या षटकात इतका यशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्विंग गोलंदाजी. भुवनेश्वरला पहिल्याच षटकात नव्या चेंडूतून ज्या प्रकारचा स्विंग मिळतो ते सर्व गोलंदाजांना शक्य नाही. एखाद्या फलंदाजाने तो चेंडू मारण्याचा प्रयत्न केल्यास चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला जातो, आणि चेंडू हुकला तर सरळ स्टंपवर जाऊन आदळतो. त्याचा चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग होत असल्याने त्याला हे यश गाठता आले.