
बिहारचे आरोग्य विभाग आपल्या नेहमी आपल्या कारनाम्यांमुळे सतत चर्चेत असते. बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कारण चैनपूर आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आता एक तरुण कधीच बाप बनू शकणार नाही. त्याचे झाले असे की, आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तरुणाचे हायड्रोसेल ऑपरेशन करण्याऐवजी त्याची नसबंदी केली. या घटनेबाबत माहिती मिळताच तरुण व त्याच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले असून कुटुंबातील सदस्य आता डॉक्टरांविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या तयारीत आहेत.
चैनपूरच्या जागरिया गावातील रहिवासी रामदहीन सिंह यादव यांचा मुलगा मेनका यादव हा हायड्रोसेलचा आकार वाढल्यामुळे खूप अस्वस्थ होता. आशा सेविकांच्या सांगण्यावरून मेनका यादवला हायड्रोसेल ऑपरेशनसाठी चैनपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मेनका यादवला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले, मात्र हायड्रोसेलचे ऑपरेशन करण्याऐवजी डॉक्टरांनी तरुणाची नसबंदी केली. मेनका यांचे अजून लग्न देखील झालेले नाही.
संबंधित रुग्णालयाला याचा जाब विचारताच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगून टाळाटाळ केली आहे. तरुणाला यासंदर्भात माहिती देऊनच नसबंदी करण्यात आली असून, हे आरोप चुकीचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास डॉक्टरांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात, असे मानले जात आहे.






























































