
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. देशभरातून या महत्त्वपूर्ण निकालाला जोरदार पाठिंबा आणि समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत असतानाच या खटल्यातील गुन्हेगार गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे गुन्हेगार त्यांच्या गावी, त्यांच्या घरी नसल्याचे उघड झाले असून यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
गुजरात सरकारने या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 15 ऑगस्ट 2022 रोजी त्यांची सुटका झाली. गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सोमवारी न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणीवर अंतिम निकाल देताना गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवला. तसेच याप्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार हा गुजरात सरकारचा नसून महाराष्ट्र सरकारचा असल्याचेही सांगितले. तसेच सर्व गुन्हेगारांना दोन दिवसांत पोलिसांत शरण येण्याचे निर्देश दिले, मात्र आता हे गुन्हेगार त्यांच्या घरी नसल्याचे समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातले वृत्त प्रसिद्ध केले आहे.
























































