भाजप नेते किरीट सोमय्या उद्या अमरावती दौर्‍यावर, अमरावती पोलीसांनी बजावली सोमय्यांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेते किरीट सोमय्या उद्या अमरावती दौऱ्यावर येत आहेत. 14 नोव्हेंबर रोजी ट्विट करून त्यांनी याबाबात माहिती दिली होती. मात्र सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांनी सोमय्या यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले असून अजूनही तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे आपला दौरा रद्द करावा अशी विनंती पोलिसांनी केली आहे. अमरावती मध्ये असलेली सध्याची तणावाची परिस्थिती बघता हा दौरा तुर्तास रद्द करावा अशी विनंती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी एका पत्राद्वारे सोमय्यांना केली आहे. मात्र मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे, असे म्हणत सोमय्या दौऱ्यावर ठाम आहे.

याबाबत बोलताना किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. ते व्हिडीओ मध्ये म्हणतात की, हिंदू समाजात दहशत माजवली जाते, अशा वेळी तिथल्या लोकांचे सांत्वन करण्यासाठी, त्यांची भिती दूर करण्यासाठी मला अमरावतीला जायचे आहे. पण काल रात्री उशिरा मला अमरावती पोलिसांनी नोटीस दिली आहे की, किरीट सोमय्या यांनी हा दौरा रद्द करावा. आज मी या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. कारण तिथल्या लोकांमध्ये फार भिती आहे. तसेच ठाकरे सरकारमधील नेते मला का थांबवत आहेत असा सवालही त्यांनी विचारला आहे.

उल्लेखनीय म्हणजे नवाब मलिक यांनी अमरावतीची दंगल भाजपाच्या नेत्यांनीच पेटविली असल्याचा आरोप केला होता. असे असताना सध्या अमरावतीचे वातावरण शांत असताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या पुन्हा अमरावतीत येऊन आगीत तेल ओतण्याचे काम करतील अशी भिती पोलीस प्रशासनाला आहे. म्हणूनच सोमय्यांना दौरा स्थगित करावा अशी पोलीस आयुक्तांनी केली आहे.