
सामना ऑनलाईन । भोपाळ
कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसासोबत भाजपच्या एका नेत्याने अश्लील वर्तन केल्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे. ही महिला पोलीस वाहनांची तपासणी करण्यासाठी उभी होती. त्यावेळी तिथे आलेल्या या मंत्र्याने तिला मारहाण करत तिची वर्दी फाडल्याचं समोर येत आहे.
ही घटना सोमवारी संध्याकाळी टीकमगढ येथे घडली. लिधौरा स्थानकात कर्तव्यावर असणारी ही महिला पोलीस उपनिरीक्षक वाहनांची तपासणी करत होती. त्यावेळी मोटार सायकलीवर आलेल्या मुबेंद्र सिंह या स्थानिक भाजप नेत्याने एका लहान मुलीला बाईकची धडक दिली आणि तिथून पळून जाऊ लागला. महिला पोलिसाने त्याचा पाठलाग केला आणि त्याला रोखायचा प्रयत्न केला. मात्र, आपल्याला रोखलेलं पाहताच सिंह याने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. मारहाणीदरम्यान सिंह याने पोलिसाची वर्दीही फाडली.
स्थानिक पोलीस स्थानकात या घटनेची माहिती मिळताच मुबेंद्र सिंह याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत घटनेवेळी उपस्थित असलेला त्याचा पंकज नावाचा साथीदार मात्र फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
























































