
सामना ऑनलाईन । लखनौ
2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधक महाआघाडी करण्याच्या तयारीत आहेत. तसेच आतापासूनच प्रत्येक राज्यातील नागरिकांचा कौल काय आहे याबाबत सर्व्हेही केले जात आहेत. अशातच देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी महाआघाडीबाबत मोठे वक्तव्य केले असून उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात महाआघाडीमुळे भाजपला थोडे-फार नुकसान होऊ शकते असे म्हटले आहे. परंतु याचा अधिक प्रभाव पडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजनाथ सिंह यांनी ‘इकोनॉमीक्स टाइम्स’ या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये विरोधकांची महाआघाडी झाल्यास भाजपला 15 ते 20 जागांचे नुकसान होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे.
मुलाखतीदरम्यान त्यांना महाआघा़डीमुळे मोदींच्या विजयरथावर अंकुश लागू शकेल का असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, नाही. 2019 मध्ये देखील भाजप बहुमताचे सरकार बनवेल. परंतु युपीमध्ये समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल हे एकत्र आल्यास त्याचा थोडा फटका भाजपला बसेल. येथे आम्हाला 15 ते 20 जागांचे नुकसान होऊ शकते. परंतु तीन-तीन पक्ष एकत्र येऊनही जास्त जागा मिळवू शकणार नाही असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक केला.
तसेच युपीत महाआघाडी झाल्यास भाजपला किती जागा मिळतील याला उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, याआधी आम्हाला 73 जागा मिळाल्या होत्या, परंतु महाआघाडीमुळे यात 10, 15 किंवा 20 जागा कमी होऊ शकतात. परंतु 15 ते 20 जागा गमावल्याने भाजपचे अधिक नुकसान होणार नाही असेही ते म्हणाले. तसेच मायावती आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवल्यासही त्याचा अधिक परिणाम भाजपच्या जागांवर होणार नाही असेही त्यांना छातीठोकपणे सांगितले.
























































