
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या चार्टर्ड विमान प्रवासावर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने (एमएसईबी) उधळपट्टी केल्याचा आरोप करत याविरोधात याचिका दाखल करणाऱया भाजपच्या मीडिया सेल प्रमुखाला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच झापले. आम्ही सध्या अत्यंत तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेत असून तुम्ही दाखल केलेल्या प्रकरणात महत्त्वाचे असे काय आहे असे खडसावत हायकोर्टाने याप्रकरणी वकिलाला जाब विचारला. एवढेच नव्हे तर या याचिकेत तातडीचे काहीच दिसत नाही असे स्पष्ट करत त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोविड काळात चार्टर्ड विमानाने मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दिल्ली असा प्रवास केला. त्यांच्या दौऱयावर एमएसईबीने खर्च केला, त्यासाठी 14.45 लाख रुपये उधळण्यात आले ही माहिती आरटीआयद्वारे काढण्यात आली असून वैयक्तिक कारणासाठी राऊत यांनी विमान सेवा वापरल्याचा आरोप भाजपच्या मीडिया सेल प्रमुख विश्वास पाठक यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
आज या याचिकेबाबत मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर माहिती देण्यात आली तेव्हा मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याना सुनावले. आम्ही 30 एप्रिलपर्यंत केवळ महत्त्वाच्या आणि अत्यंत तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेत असून तुमच्या याचिकेत तातडीचे असे काहीच दिसत नाही, असे न्यायमूर्ती म्हणाले व त्यांनी याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.






























































