भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेचा फतवा; डब्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या भाज्यांवर बंद, शाळेच्या अ‍ॅपवरून विद्यार्थी-पालकांना सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यूषण काळात मीरा-भाईंदरमध्ये मासे, मटण विक्रीवर महापालिकेने बंदी घातल्याची घटना ताजी असतानाच आज भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळेने अजब फतवा काढला आहे. शाळा व्यवस्थापनाने पर्यूषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, बटाटा, लसूण, बीट आदी कंदमुळांच्या भाज्या आणण्यावर बंदी घातली आहे. शाळेच्या अ‍ॅपवरून विद्यार्थी आणि पालकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार मेहता यांच्या शाळेच्या तुघलकी कारभाराविरोधात पालकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

जैनधर्मीयांच्या पर्यूषण पर्वाला १६ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. या काळात जैनधर्मीय कांदा, लसूण, बटाटा आदी कंदमुळे वर्ज्य करतात. या पर्यूषण काळात मीरा-भाईंदर महापालिकेने दोन पावले पुढे जात थेट संपूर्ण मीरा-भाईंदर शहरात दोन दिवस मासे, मटणाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. याला मीरा-भाईंदरमधील भूमिपुत्र नागरिक आणि मराठी एकीकरण समितीने कडाडून विरोध केल्याने गदारोळ उठला असतानाच, आज भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळेने एक अजबच फतवा जारी केला. पर्यूषण काळात विद्यार्थ्यांनी कोणता आहार करावा, डब्यात कोणत्या भाज्या आणाव्यात याबाबतचे सूचनापत्रकच त्यांनी शाळेच्या अ‍ॅपवरून विद्यार्थी व पालकांना पाठवले आहे.

मनसेची शिक्षण विभागाकडे तक्रार

सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत सर्व जाती-धर्मांची मुले शिकतात. त्यांचा धर्म, संस्कृती, परंपरा आणि आहार वेगळा आहे. मात्र तरीही सगळे एकोप्याने राहतात. परंतु कोणत्याही एका धार्मिक परंपरेच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांच्या आहारावर निर्बंध का लादले आहेत, असा सवाल मनविसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष रॉबर्ट डिसोझा यांनी केला. त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार केली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

  • पर्यूषण काळात आहाराच्या निवडीबाबत शाळेने अ‍ॅपवरून सूचनापत्रक पाठवले आहे. या काळात विद्यार्थ्यांनी जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या जसे कांदा, लसूण, बटाटा, बीट आदी कंदमुळे आहारात टाळावीत. या कंदमुळांचा समावेश असलेल्या भाज्या डब्यातून आणू नयेत. त्याचबरोबर शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण, बटाटा आणि बीट असलेले कोणतेही पदार्थ मिळणार नाहीत, असे या सूचनापत्रकात नमूद केले आहे.