
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे. असे असले तरी 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या जागांत घट होणार असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार या राज्यांत मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जागांचा तोटा होईल. भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या समितीनेच तसा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सोपविला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीकर देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी भाजपकडून विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने प्रत्येक राज्यातील स्थानिक पदाधिकारी, अभ्यासक व विश्लेषक यांच्याकडून माहिती घेऊन राज्यनिहाय आपला अहवाल तयार केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात सादर केलेल्या या अहवालात 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये दुहेरी आकडय़ात भाजपला नुकसान होईल, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी रात्री उशिरा ट्विट करत आपण असा कोणताही अहवाल दिलेला नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रात नकारात्मक स्थिती
महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला 42 जागा मिळाल्या होत्या. राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजप आणि शिंदे गटाचे मिळून 22 ते 25 खासदार निवडून येतील. ही संख्या 25 च्या पुढे जाणार नाही. महाराष्ट्रात भाजपसाठी नकारात्मक स्थिती असल्याचे तावडे समितीच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांचा अहवाल भाजपविरोधात आहे. त्याचप्रमाणे लोकसभेतही भाजपला मोठा फटका बसेल असा अहवाल भाजपने स्थापन केलेल्या समितीने दिला आहे.
बिहारमध्ये मागच्या निवडणुकीत भाजपने नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या मदतीने मुसंडी मारली होती, मात्र नितीश यांनी भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. आरजेडी-जेडीयू युतीमुळे लोकसभेत भाजपचा तोटा होईल.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेक्षणात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून आले होते. तसेच महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत एकत्र लढल्यास भाजपला मोठा फटका बसेल. महाराष्ट्रात भाजपच्या जागांत थेट 50 टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.



























































