‘महाआघाडी’विषयी साशंकता पसरवण्याचा भाजपचा डाव, उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

भाजपविरोधातील पक्षांची ‘महाआघाडी’ टिकणार नाही, असा संदेश जनतेत पोहाचवण्यासाठीच भाजपने कर्नाटकातील काँग्रेस-जदसे आघाडीचे सरकार पाडून टाकण्यासाठी कारवाया सुरू केल्या आहेत, असा आरोप काँग्रेस नेते, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर राव यांनी आज केला.

भाजपविरोधात निर्माण होणाऱया ‘महाआघाडी’च्या भवितव्याविषयी जनमानसात साशंकता फैलावण्याचा भाजपचा डाव आहे, असे त्यांनी सांगितले. कर्नाटकातील काँग्रेस-जदसे सरकारच्या शपथविधी सोहळय़ाला देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून ‘शक्तिप्रदर्शन’ घडवले होते. त्यामुळे भाजपने कर्नाटकातील आमच्या सरकारला ‘टार्गेट’ ठरवून ते पाडण्यासाठी कारवाया चालवल्या आहेत, असे परमेश्वर राव म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस आणि काँग्रेसचे कर्नाटकचे प्रभारी के.सी. वेणुगोपाल हे बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री परमेश्वर राव आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते सिद्धरामय्या यांनी वेणुगोपाल यांची भेट घेतली. आमची तर लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे, असे बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी सांगितले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी काँग्रेस-जदसेचे सरकार भक्कम, स्थिर आहे. काँग्रेसचा एकसुद्धा आमदार राजीनामा देणार नाही व भाजपकडे जाणार नाही, असे ट्विटरवरून स्पष्ट केले.