
मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या 9 ने वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे आता प्रभागांचे नव्याने सीमांकन होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिकेला पुन्हा एकदा सर्व प्रभागांच्या सीमा लोकसंख्येनुसार निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाला कच्चा अहवाल सादर करावा लागणार आहे. यामध्ये सुधारणा आणि मंजुरीनंतर अंमलबजावणी या प्रक्रियेला वेळ जाण्याची शक्यता असल्यामुळे फेब्रुवारीत होणाऱया संभाव्य निवडणुका एका महिन्याने पुढे जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेत सद्यस्थितीत 227 नगरसेवक आहेत. तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. मात्र वाढलेल्या लोकसंख्येमुळे मूलभूत सोयीसुविधांसाठी नगरसेवक वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेतील निवडून येणाऱया नगरसेवकांची संख्या 236 वर जाणार आहे. यामध्ये पूर्व उपनगरात चार तर पश्चिम उपनगरात पाच नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. शहर विभागात लोकसंख्या वाढली नसल्याने या ठिकाणी नगरसेवक वाढण्याची शक्यता नाही.
मुदतवाढ की प्रशासक?
‘कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने नवी मुंबई पालिकेवर प्रशासक नेमून कार्यभार सुरू ठेवण्यात आला. मात्र मुंबई महानगरपालिकेला जनगणनेच्या कारणास्तव 1990 ते 1992 या दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आगामी काळात मुंबई महानगपालिकेसाठी नेमका कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आरक्षण सोडतीचीही प्रतीक्षा
निर्णयाबाबत राज्य सरकारकडून अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर तातडीने कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. आरक्षण सोडतही अद्याप काढलेली नाही. ही कार्यवाही निर्धारित वेळेत पार पडली तरच नियोजित वेळेनुसार फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका होतील. अन्यथा किमान एक महिना निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

































































