
मुंबई महापालिकेच्या मुख्य लिपिक पदाच्या पदोन्नतीसाठी 16 एप्रिलपासून तीन दिवस खात्यांतर्गत परीक्षा होणार आहे. या परीक्षेला जवळपास 2700 कर्मचारी बसलेले आहेत, मात्र सध्या काही कर्मचारी कोरोनाबाधित असून काही गृह विलगीकरणात आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले, पण चचणी न केलेले कर्मचारी सदर परीक्षेला हजर राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पदोन्नतीच्या सदर परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी पालिका कर्मचाऱयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र मुंबई महापालिकेच्या मुख्य लिपिक पदाच्या खात्यांतर्गत पदोन्नतीसाठी तीन दिवस परीक्षा होणार आहेत. या परीक्षेला बसलेले अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झालेले आहेत. त्यापैकी काहीजण बाधित असूनही परीक्षेला बसता यावे म्हणून आरटीपीसीआर चाचणी करून घेत नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे असे कर्मचारी परीक्षा केंद्रावर हजर राहिले तर इतरही कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. तर जे कर्मचारी कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात किंवा गृह विलगीकरणात आहेत. तसेच अनेकजण इमारती सील केल्याने बाहेर पडू शकत नसल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच परीक्षेला होणाऱया गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना सुचवलेल्या नाहीत. त्याची दखल घेत पालिकेच्या सरेंद्र पाडळकर, भूषण तांबे यांच्यासह 150 कर्मचाऱयांनी सदर परीक्षा पुढे ढकलाव्यात म्हणून मुख्यमंत्र्यांना सह्यांचे निवेदन दिले आहे.
पदोन्नतीची परीक्षा वेळेतच व्हावी असा नियम नाही
कर्मचाऱयांच्या पदोन्नतीबाबत घेतली जाणारी परीक्षा वेळेतच घ्यावी असा कोणताही नियम नाही. याआधी प्रशासनाला वाटेल तेव्हा परीक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात कोणतीही अडचण नाही असेही कर्मचाऱयांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.



























































