
देवेंद्र भगत । मुंबई
मुंबईत 22 आणि 23 सप्टेंबर रोजी झालेल्या विक्रमी पावसात विविध ठिकाणी अडकलेल्या तब्बल 22 जणांचा जीव वाचवण्याची जिगरबाज कामगिरी पालिकेने केली आहे. या दोन दिवसांत पालिकेच्या आपत्कालीन विभागात 2 हजार 400 कॉल आले. यातील सात कॉलमध्ये आपत्कालीन विभागाच्या माहितीनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन 22 जणांचा जीव वाचवला.
मुंबईत मंगळवार 22 सप्टेंबर रात्रीपासून मुसळधार बरसणाऱया पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते-रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. काहींच्या घरात पाणी शिरले. पावसाचा जोर इतका भयंकर होता की सप्टेंबरमध्ये तब्बल 26 वर्षांनी 24 तासांत पडलेला विक्रमी पाऊस ठरला. मुंबईत 1974 मध्ये असा मुसळधार पाऊस पडला होता. अतिवृष्टीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय, खासगी कार्यालये-कंपन्या बंद कराव्या लागल्या. अतिवृष्टीमुळे मिठी नदीच्या पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्यामुळे पुर्ला येथे मिठी नदीला लागून असलेल्या क्रांतीनगर परिसरातील 50 रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.
जोरदार पाऊस आणि वारा यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. घराचे भाग कोसळणे, शॉर्टसर्पिट, झाडे-झाडाच्या फांद्या पडणे, भिंत कोसळणे, पाण्यात गाडी अडकणे असे हजारो कॉल पालिकेच्या ’1916’ क्रमांकावर आले. यातील 7 कॉलमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. यातील वेगवेगळ्या घटनेत 22 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. यामध्ये फक्त एका दुर्घटनेत लिफ्टमध्ये अडकून दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, आपत्कालीन विभागात कॉल आल्यानंतर तातडीने याची माहिती अग्निशमन दल आणि आवश्यकता भासल्यास संबंधित विभागाचे प्रशासन आणि पोलीस यांना दिली जाते. यानुसार तातडीने कार्यवाही करून बचावकार्य केले जात असल्याची माहिती आपत्कालीन विभाग उपायुक्त प्रभात रहांगदळे यांनी दिली.
भाटिया रुग्णालयाजवळ 40 नर्सेसची सुटका
मुंबईत 22 आणि 23 सप्टेंबर रोजी इतका भयंकर पाऊस झाला की अनेक वाहने जागच्या जागी अडकून पडली. मात्र याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन प्रवाशांची सुटका केली. अशी एक घटना भाटिया हॉस्पिटलजवळ घडली. यामध्ये पाण्यात अडकलेल्या बसमधून तब्बल 40 नर्सेसची सुटका केल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली. मुंबईत कोणत्याही ठिकाणी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवत असल्याचे ते म्हणाले.



























































