
मुंबईत मालमत्ता कर थकबाकीदारांवर धडक कारवाई सुरू असून आज बोरिवलीत बांधकाम सुरू असलेल्या जागेवरील साईट ऑफिस ‘सील’ करण्यात आले तर बांधकामासाठी उपयोगात येणारे मिक्सर जप्त करण्यात आले. त्याचबरोबर वर्सोवा, अंधेरी, मालाड, गोवंडी, माटुंगा परिसरात जलजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मुंबईत पालिकेकडून कारवाई सुरू असून चारचाकी वाहने-वातानुकूलन यंत्रणा जप्त करणे, जलजोडणी खंडित करणे, जप्ती करणे, दंड आकारणी सुरू आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये रुपये 5 हजार 200 कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य असून आजपर्यंत रुपये 4 हजार 100 कोटी एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे. सध्या सुरू असलेल्या मालमत्ता करवसुली मोहिमेंतर्गत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी विनंती करण्यात येत असून त्यानंतरच्या टप्प्यात नोटीस देण्यात येत आहेत, मात्र जे मालमत्ताधारक वारंवार विनंती करुन व नोटीस पाठवूनदेखील मालमत्ता कर रकमेचा भरणा करत नाहीत त्यांच्यावर नाइलाजाने कारवाई अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या ठिकाणी करण्यात आली कारवाई
– वर्सोवा परिसरात निवासी इमारतीची 87 लाख 24 हजार 452 रुपयांची थकबाकी असल्यामुळे इमारतीच्या 4 जलजोडण्या तोडण्यात आल्या.
– ‘के-पश्चिम’ विभागात एका मालमत्तेवर रुपये 97 लाख 38 हजार 420 एवढी थकबाकी होती. त्याची जलजोडणी तोडण्यात आली.
– मालाड पश्चिम परिसरातील राइट चॅनल कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांची 2 कोटी 65 लाख 10 हजार 400 एवढी थकबाकी होती. या मालमत्तेची जलजोडणी तोडण्यात आली.
– गोवंडी परिसरातील एका मालमत्तेवर मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी वाहने जप्त करण्यात आली. या धडक कारवाईनंतर संबंधितांनी 29 लाखांचा भरणा केला.



























































