पालिकेत वैधानिक समित्यांच्या निवडणुकांचे पडघम, एप्रिलपासून नामनिर्देशन अर्ज भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी कोरोनामुळे सहा महिने रखडलेल्या वैधानिक निवडणुका या वर्षी मात्र वेळेवर होत असून 1 एप्रिलपासून नामनिर्देशन अर्ज भरण्यात येणार आहेत. यात स्थायी, बेस्ट, सुधार आणि शिक्षण या चार वैधानिक समित्या, सहा विशेष समित्या आणि 17 प्रभाग समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

पालिकेच्या वैधानिक समित्यांसह विशेष समित्या अध्यपदांची निवडणूक दरवर्षी एप्रिलमध्ये होते. यात स्थायी, बेस्ट, सुधार आणि शिक्षण या चार वैधानिक समित्या तसेच स्थापत्य (शहर व उपनगर), विधी, आरोग्य, महिला व बालकल्याण, बाजार व उद्यान या विशेष समित्यांच्या आणि 18 प्रभाग समित्यांच्या निवडणुका होतात.

गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे सहा महिने निवडणूक घेता आली नाही. ऑक्टोबरमध्ये या निवडणुका घेण्यात आल्या. त्यामुळे सध्या असलेल्या समिती अध्यक्षांना केवळ सहा महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला. यातच आता एप्रिलमध्ये पुन्हा या निवडणुका होणार असल्याने पालिकेत निवडणुकीचे वारे आहेत. पुढील वर्षी पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका असल्याने या निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

असे आहे निवडणुकांचे वेळापत्रक

शिक्षण व स्थायी समिती – 5 एप्रिल
बेस्ट आणि सुधार समिती – 6 एप्रिल
स्थापत्य शहर आणि
उपनगर – 8 एप्रिल
सार्वजनिक आरोग्य आणि बाजार
व उद्यान समिती – 9 एप्रिल
विधी आणि महिला व बालकल्याण समिती – 12 एप्रिल
प्रभाग समित्या – 19 ते 22 एप्रिल