Tabu – तब्बू! सुंदर,धाडसी,चाकोरीबाहेरचा विचार करणारी गोड अभिनेत्री

प्रिया भोसले

तेव्हा रोहिणी हट्टंगडींचं चंदेरी मासिक घरी यायचं.सिनेमाबद्दल प्रचंड आकर्षण असल्यामुळे पान न् पान वाचलं जायचं. त्याच चंदेरीमधे अनिल कपूरच्या भावाच्या संजय कपूरच्या डेब्यू फिल्मची बातमी आलेली होती.संजय कपूरसोबत कुणा तब्बू नावाच्या नवीन हिरोईनचं नाव होतं. मनात म्हटलं तब्बू हे काय नाव आहे? सिनेमा यथातथाच होता.तब्बू नावाची हिरोईन ही फार काही आवडली नाही. पण तीच तब्बू एकदा चित्रहारमधे अजय देवगणसोबत गुलाबी साडीत ‘राहों में उनसे मुलाकात हो गयी’ गाण्यात दिसली. तेव्हा मात्र ती फार फार आवडली. टिपिकल हिरोईन मटेरियल,सणसणीत उंची, सुंदर केस आणि गोड चेहऱ्यावरचे निरागस भाव.खरंतर अँक्शन पिक्चरच्या परंपरेनुसार हिरोईन म्हणून तिच्या वाट्याला फार काही आलं नव्हतं. तसाही तो सिनेमा फुल और काँटेच्या सुपरहिट सिनेमाच्या यशाचा शिलेदार अजय देवगणचा होता म्हटल्यावर हिरोईनला असा काय वाव असणार होता म्हणा.

पिक्चर बघून तब्बूही तिच्या समकालीन हिरोइन्ससारखी फक्त ग्लॅमडॉल बनून राहते की काय असा विचार टिकत नाही तोवर विरासत नामक सुनामी आला आणि प्रेक्षकांनी, सिनेसमिक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं.समीक्षकांच्या प्रत्येक लेखात तब्बू नाव गाजू लागलं. इतकं काय कौतुक होतयं म्हणून विरासत पाहिला. तर हीच का ती गर्ल नेक्स्ट डोअर तब्बू असा प्रश्न पडला.तिचा अफाट अभिनय, शब्दांआधी नजरेने बोलणाऱ्या तब्बूने अक्षरशः संम्मोहित केलं. तिने साकारलेली गेहना दुसरी कुणी तितक्या ताकदीने करूच शकणार नाही असा सणसणीत मेसेज देण्यात ती अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरली. आपण इतर हिरोईन्ससारखं फक्त ग्लॅमडॉल म्हणून राहणार नाही हे सिद्ध करुन दाखवलं ते ही एका कमर्शियल सिनेमातून,गंमतच आहे!

आज  काजोलचा अपवाद सोडला तर तिच्या समकालीन हिरोईन्सपैकी आज कुणीही टिकलेलं नाही.  काजोल जरी ह्या शर्यतीत टिकून असली आणि तिला शाहरुख,करण जोहरसारखे मित्र लाभले आहेत ही बाब विसरता कामा नये. काजोलच्या वाट्याला तब्बूसारखे अभिनयाचा कस लागतील असे चित्रपट कमी आले हे देखील विसरता कामा नये.

माचिस,विरासतनंतर तब्बूला तिच्या अभिनयक्षमतेप्रमाणे चित्रपट मिळत गेले.महेश मांजरेकरांचा अस्तित्व,मधुर भांडारकरचा चांदनी बार,गुलजार यांच्या माचिससारख्या सिनेमाने तब्बूला मेथड अॅक्टरच्या कॅटेगरीत स्थान दिलं

माचिसमधून तब्बूने चित्रपट निवडण्याची दिशा बदलली.माचिसला म्हणावं तसं यश मिळालं नाही पण तिच्या अभिनयाची मात्र दखल घेतली गेली.त्यानंतर आलेल्या विरासतने ते मत ठाम केलं आणि मग आला महेश मांजरेकरांचा अस्तित्व.

अस्तित्वचा विषय तसा नाजूकच. पिक्चरची हाताळणी आणि मुख्य स्त्री कलाकार जर तितक्या ताकदीची नसेल तर कदाचित आदितीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना पटणार नाही असा विचार करुनच मांजरेकरांनी तब्बूला घेतलं असावे. त्यांच्या निर्णयाला दाद द्यावी इतकी तब्बूने आदिती समरसून केली. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता केलेली संवादफेक हा तिच्या अभिनयाचा युएसपी. मला आठवतयं अस्तित्वचा एक शो स्त्रियांसाठी होता.क्लायमॅक्समधे तब्बूच्या प्रत्येक डायलॉगवर सिनेमागृहात शिट्ट्या  वाजत होत्या.पडद्यावर अस्तित्वतील तब्बू आदितीमय झाली होती आणि प्रेक्षकगृहातील प्रत्येक स्त्री तब्बूमय.

त्यानंतर आलेल्या चांदनी बारसाठी तर तिला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.मधुर भांडारकरांनी एका मुलाखतीत चांदनी बारसाठी पहिली आणि शेवटची निवड तब्बूच होती सांगितलं होतं.ह्यातून, तब्बूने होकार दिला नसता तर चांदनी बार रूपेरी पडद्यावर आलाच नसता, असं सूचित होणं म्हणजे एकप्रकारे तिच्या अभिनयाला मिळालेली पोचपावतीच म्हणावी लागेल.

काही पठडीबाज सिनेमे करता करता गुलजारचा माचिस, हुतुतू, विशाल भारद्वाजांचा मकबूल, हैदरसारख्या सिनेमांची निवड करणाऱ्या तब्बूत प्रगल्भ अभिनयाइतकेच चाकोरीबाहेरचा विचार करण्याचं धैर्य दिसून येते आणि हीच गोष्ट तिला इतरांपेक्षा वेगळी करते. मेनस्ट्रीम सिनेमात आपण मागे पडू म्हणून कित्येक स्त्री कलाकार फक्त शोभेची बाहुली बनून राहण्यात धन्यता मानत असताना, तब्बूने तो मोह अगदी सहजपणे सोडून दिला.

तिच्या चित्रपट निवडीचा निकष हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. तब्बूने सिनेरसिकांना अनेकदा सुखद धक्के दिले असून तिचे चित्रपट आणि भूमिका म्हणजे वेगळेपण असणारच ही खूणगाठ रसिकांनी मनाशी बांधली आहे. ती जे करेल ते बावनकशी सोन्यासारखं अस्सलच असणार ह्याची खात्री वाटू लागली.

आता चिनी कमचंच बघा ना, अभिनयाचं रीतसर शिक्षण न घेता महानायक अमिताभसमोर ती ज्या आत्मविश्वासाने उभी राहिलीय त्याला तोडच नाही. सिनेमातला तिचा सहज वावर,तिचं दिसणं ह्यामुळे ती जोडी विजोड न वाटता अतिशय सुंदर वाटली.अभिनयाच्या बाबतीत अमिताभ समोर ती कुठेही कमी पडली नाही.  अभिनयाची ‘प्रेम’ळ जुगलबंदी दोघांच्या वयातल्या तफावतीकडे लक्ष ठेऊन आवडून जाते, ह्यासाठी आपण मनातल्या मनात त्याचं क्रेडिट तब्बूला देऊन टाकतो.

तीच गोष्ट दृष्यमची, तब्बल 16 वर्षानी अजय देवगणसोबत तिने दृष्यम मधून कमबॅक केलं.पहिला दृष्यम तिने अजय देवगणसोबत खिशात घातलेलाच होता. पण मल्याळम दृष्यमच्या सिक्वलमधे ‘आशा शरथ’ला  बघताना तब्बूच्या अभिनयाची अतोनात आठवण येत राहिली. मोहनलाल यांच्यासोबत जर मूळ चित्रपटात तब्बू असती तर? असा विचार अनेकदा मनात घोळत राहातो.

असाच एक दुग्धशर्करा योग जुळून आलेला सिनेमा होता…द नेमसेक. इरफान आणि ती. सोबत मीरा नायरचं प्रभावशाली दिग्दर्शन. क्लास ऑडियन्ससाठी तर डोळ्यांचं,मनाचं पारणं फिटेल असा सिनेमा. ह्यात तब्बू कसली विलक्षण सुंदर दिसलीय.दोन कसलेले कलाकार आणि दर्जेदार चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर. अभिनयात तोडीस तोड असलेल्या दोन कलाकारांचा हा चित्रपट म्हणजे अभिनयातील काँटे की टक्कर कॅटेगरीतला होता.

तब्बूबद्दल लिहायला गेलं तर एक लेख अपुरा पडेल.  तबस्सुम हाशमी उर्फ तब्बू 1985 मध्ये हम नौजवानमध्ये  पहिल्यांदा झळकली तेव्हा ही मुलगी सिनेसृष्टीत व्हर्सटाईल शब्दाला आपल्या अभिनयाद्वारे नवा आयाम देईल असं कुणी म्हटलं असतं तर त्याला तेव्हा नक्कीच वेड्यात काढलं गेलं असतं. इतरांचं जाऊ दे पण तेव्हा तिला तरी त्याची जाणीव होती का प्रश्न पडतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपल्याला आपण जसे सापडत जातो, तसंच तब्बूला तिच्यातली सामर्थ्यवान, कसलेली अभिनेत्री सापडत गेलेली दिसते, तिचा हा प्रवास संपलेला नसून तिला  अजूनही ती सापडेल. कदाचित येत्या काही पिक्चर्समध्ये तब्बू तिचं नवं रुप ही घेऊन येऊ शकते,कारण ती तब्बू आहे आणि तिच्यासाठी अशक्य असं काहीही नाही.  तब्बूच्या अभिनयाचा प्रवास 1985 पासून सुरु होऊन आजघडीला म्हणजेच 2023 पर्यंत तसाच रसरशीत आणि टवटवीत वाटतो. तो यापुढेही तसाच राहावा. ह्या चतुरस्त्र, सुंदर अभिनेत्रीला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा!

( लेखिका या चित्रपट समीक्षक आहेत )