‘हवाहवाई’ श्रीदेवीचं आयुष्य उलगडणार, बोनी कपूर यांची चरित्राची घोषणा

हिंदी चित्रपटातील सुपरस्टार दिवंगत श्रीदेवी यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. फेब्रुवारी 2018मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन हे सगळ्यांसाठी एक मोठा धक्का होता. अशा या सुपरस्टारच्या वादळी आणि लखलखत्या आयुष्याचा पट लवकरच पुस्तकातून उलगडणार आहे.

श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी – द लाइफ ऑफ अ लीजंड’ या चरित्राची नुकतीच घोषणा करण्यात आली. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी ही घोषणा केली. ही घोषणा करत असताना या पुस्तकाचं काम कुठपर्यंत आलं आहे, याची माहितीही त्यांनी दिली आहे.

श्रीदेवी यांच्याबद्दल आणि त्यांच्या जीवनावर आधारित या चरित्राबद्दल व्यक्त होण्यासाठी बोनी कपूर यांनी एक ट्वीट केलं. ते म्हणाले की, तिच्या (श्रीदेवी) व्यक्तिमत्वात एक प्रकारची ताकद होती. जेव्हा जेव्हा ती तिच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावरून भेटायला यायची, तेव्हा तेव्हा ती सर्वात जास्त खुश असायची. ती खूप निडर होती. धीरज कुमार यांना ती आपल्या कुटुंबातलाच एक सदस्य मानायची आणि आज ते श्रीदेवीच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहीत आहेत याचा आम्हाला फार आनंद आहे. ते एक संशोधक आणि लेखक आहेत, असं बोनी यावेळी म्हणाले.

बोनी कपूर यांनी केलेलं ट्वीट सध्या खूप व्हायरल होत आहे. सध्या या पुस्तकाचं लिखाण सुरू असून हे चरित्रपुस्तक या वर्षाच्या अखेरपर्यंत चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.