
बॉलीवूड अभिनेता सलमान खानने पनवेल येथील अनिवासी हिंदुस्थानी नागरिकाविरुद्ध दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. सलमानने याआधी दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. तेथे निराशा झाल्याने त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले.
सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसशेजारील जमिनीचा मालक असलेल्या एनआरआय केतन कक्कड याने सोशल मीडियात बदनामीकारक मजकूर, व्हिडीओ शेअर केले. त्यातून धार्मिक तेढ निर्माण होण्याचीही शक्यता आहे, असा दावा सलमानने गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात केला होता. केतन कक्कडला सोशल मीडियात बदनामीकारक व्हिडीओ अपलोड करण्यापासून तातडीने रोखा, अशी विनंती सलमानने दिवाणी न्यायालयाला केली होती, मात्र कनिष्ठ न्यायालयाने त्याला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. कक्कडच्या म्हणण्यानुसार, सलमानने फार्महाऊसजवळील माझी जमीन हडपण्यासाठी दबावतंत्र अवलंबले आहे. या पार्श्वभूमीवर सलमानच्या अपिलावर उभय पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला.





























































