
>> प्रवीण बर्दापूरकर
मुखपृष्ठ पाहताच एखादं पुस्तक लगेच वाचावसं वाटावं आणि ते वाचून संपल्यावर समाधान दुथडी पार पोहोचावं, असं नेहमी घडत नाही. ‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ हाती आल्यावर आणि ते वाचल्यावर असं खूपसं घडलं. हा एक काव्यसंग्रह असून, कवी आहेत इंद्रजित भालेराव तर मुख्यपृष्ठकार आहेत सरदार जाधव!
इंद्रजित भालेराव यांच्याविषयी थोडसं वेगळं सांगायला हवं. वयानं ते माझ्यासाठी धाकटी तर वाङ्मयीन आवाका लक्षात घेतला तर मोठी पाती. पत्रकारितेच्या निमित्तानं माझी मुशाफिरी नागपूर आणि मुंबईत सुरू असताना अडीच-तीन दशकांपूर्वी इंद्रजितची कविता वाचनात आली आणि ती थेट भिडली. त्यांचा ‘पीक पाणी’ हा कविता संग्रह वाचनात आला आणि आजच्या संगणकाच्या भाषेत सांगायचं तर इंद्रजित भालेरावचं नाव मेमरीत कायमचं सेव्ह झालं.
आमची भेट मात्र परभणी, महाराष्ट्र किंवा देशात नाहीतर बीडच्या सतीश साळुंकेसारखी चक्क अमेरिकेत सॅन होजे इथं, विश्व मराठी साहित्य संमेलनात. नंतर आमच्या नागपूर मुक्कामी भेटी झाल्या. इंद्रजितचं ललित लेखनही वाचनात आलं.
काव्य असो का ललित, इंद्रजितची नाळ भूमीशी आहे. भूमीशी म्हणजे इथला माणूस, पशू-पक्षी, शेती, निसर्ग असं सर्व काही. या सर्वांच्या संदर्भात इंद्रजित हळवा आहे आणि त्याचं ते हळवेपण त्याच्या लेखनात आलेलं आहे. भूमी आणि भूमीशी संबंधित सर्व घटकांचं असं त्याच्या शब्दातलं येणं, आपल्याही भावविश्वाचा एक भाग बनत जातं. कारण माणूस शेती, पशू-पक्षी अशा सर्वांविषयी इंद्रजित डोहखोल संवेदनशीलपणे लिहित जातो; या सर्वांच्या विषयी आपल्याला ज्ञात असलेल्या आणि नसलेल्या पैलूंचे उल्लेख इंद्रजितच्या लेखनात येतात आणि अनेकदा आपल्याही ते नव्यानेच आकळत असल्याचं जाणवत राहतं.
व्यक्त होतानाही इंद्रजित ऋजुतेची वेगवेगळी रूपं दाखवत असतो. आवाजी द्रोह किंवा विद्रोह, कठोरपणा, द्वेष, सूड भावना, मत्सर असं काहीच इंद्रजितच्या लेखनात येत नाही; त्यासंदर्भातले संकेतही त्याचं लेखन देत नाही, हे मला तरी फार महत्त्वाचं वाटतं. लहानपणी (1960 च्या आधी) अंगणातल्या बाजेवर पहाटेच्या अर्धवट झोपेत ऐकू आलेल्या काकड आरतीच्या सुरांसारखं इंद्रजितचं लेखन आपल्याला आवडत जातं. ‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ हे लेखनही त्याला अपवाद नाही.
‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ हा व्यक्तिचित्र लेखनाचा काव्यमय प्रयोग आहे. त्यात सोळा व्यक्तिचित्रं आहेत. त्यातल्या चार-पाच जणांचा अपवाद वगळता अन्य कोणालाही इंद्रजित भालेराव यांनी बघितलं असण्याची शक्यता नाही, मात्र त्या व्यक्तीचं माणूस आणि कार्य म्हणून इतक्या मोठ्या आहेत की, त्यांचा प्रभाव इंद्रजित भालेरावच्या जडणघडणीवर पडला आणि तो इथे शब्दांत व्यक्त झाला आहे. त्यात चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, कबीर, तुकाराम, गाडगेबाबा यांच्यासारखे संत, तर महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शरद जोशी, साधनाताई आमटे यांच्यासारखे अतुलनीय कामगिरी बजावणारी व्यक्तिमत्त्व आहेत. विलासराव साळुंखे, पोपटराव पवार, भाई उद्धवराव पाटील यांचा सहवास इंद्रजित भालेराव यांना लाभलेला असू शकतो.
या म्हटलं तर दीर्घ कविता आहेत अन् काव्यातून या सगळ्या व्यक्ती वेगळ्या ढंगात आपल्यासमोर येतात. व्यक्तिचित्र लेखन म्हटलं ते गद्य असलं पाहिजे हा जो समज आहे त्याला या लेखनातून छेद देण्यात इंद्रजित भालेरावनं कवी म्हणून चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे. खरं तर यातील बहुसंख्य व्यक्तीबद्दल इंद्रजितनं जे काही सांगितलं आहे त्यात नवीन म्हणावी अशी फारशी काही माहिती नाही, पण इंद्रजितच्या काव्यमय शैलीमुळे या सर्व व्यक्तींच्या कर्तृत्वाचा अनाहत नाद आपल्यालाही ऐकू येतो, हीही या लेखनाची आणखी एक जमेची बाबच म्हणायला हवी. लेखकाच्या मनातली व्यक्ती वाचकालाही आपली वाटावी, अशा पद्धतीनं शब्दबद्ध होण्यासाठी लेखनाचा मोठा रियाज लागतो आणि ज्याच्यावर लिहिलं जातंय ती व्यक्ती समजण्याचा आवाकाही वैपुल्यानं लागतो. ही कसोटी लावली तर ‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’मधील व्यक्तिचित्रं आपल्याही भावतात. साधनाताई आमटे यांच्याविषयी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलं आहे –
तुझा पदर केवढा
झाला आभाळाएवढा एवढा
त्याच्या खाली समावला
अनाथांचा पोरवडा
इंद्रजित भालेरावची भूमिनिष्ठा मुखपृष्ठकार सरदार जाधव यानं मुखपृष्ठावर अचूकपणे रेखाटली आहे. महापुराच्या दीर्घकाळ रेंगाळलेल्या पाण्याचा गडद मातकट रंग आणि त्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आलेली प्रतीकं, असं अतिशय ऐटबाज मुखपृष्ठ सरदार जाधवनं केलेलं आहे. चित्रकलेत रुची असणाऱ्यांनी एकदा तरी ते बघावं असंच ते आहे. विलास फुटाणेनं (आदित्य प्रकाशन) पुस्तकाची मांडणी हातचं राखून न ठेवता मोकळेपणानं केली आहे. थोडक्यात काय तर जमेल तसा आवर्जून वाचावा असा हा काव्यसंग्रह आहे.
‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’
कवी : इंद्रजित भालेराव
प्रकाशक : आदित्य प्रकाशन, संभाजीनगर
पृष्ठ : 156, मूल्य : रुपये 250/-





























































