
>> श्रीकांत आंब्रे
‘ताणाबाणा’ ही ज्येष्ठ लेखक आणि क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांची एका वेगळय़ाच विषयावरील कादंबरी. हातमागावर वस्त्र विणण्यात ख्याती असलेल्या स्वकुळ साळी समाजात ते जन्माला आले. काही जाती त्यांच्या व्यवसायावरून नावारूपाला येतात. स्वकुळ साळी ही विणकरांची जात तशीच. पूर्वी गावागावात या समाजाची वस्ती असलेल्या घराघरात हातमागावर लुगडी, साडय़ांपासून पैठण्यांपर्यंत अनेक तऱ्हेची कलाकुसर केलेली वस्त्र विणणे आणि ती विकणे हा त्यांचा पिढीजात व्यवसाय होता. हातमागावर काम करणारे साळी फक्त पोटापाण्याचा उद्योग म्हणून या व्यवसायाकडे न पाहता एक कला म्हणून पाहत होते. साडीवर वेलबुट्टी, पदराची नक्षी, किनारीचा काठ, मोर, कोयरी, नारळी, पुष्पाकृती अशा अनेक तऱहेच्या कलाकृती केवळ कल्पनेने तयार करण्यात त्यांचे कसब पणाला लागत असे. मौल्यवान पैठणीत जरी आणि सोनं वापरताना त्यांच्या अंगी असलेल्या धातुशास्त्राच्या विद्येची कसोटी लागे. कोणतेही वस्त्र विणण्यात प्रतिभा आणि कल्पनाशक्तीचा वापर करावा लागत असे.
गावात गुण्यागोविंदाने नांदणारा हा समाज मुंबई आणि इतर शहरांतील यंत्रमागाच्या आगमनानंतर मात्र हातमागाच्या व्यवसायाला आलेल्या अवकळेमुळे पार खचून गेला. त्याच्या जीवनाच्या वस्त्रालाच ठिगळं पडू लागली. वस्त्र विणण्याच्या कलेच्या वैभवाचा काळ ज्या समाजाने पाहिला होता तो समाज मुंबईतील कापड गिरण्यांतील कामगार बनण्यासाठी धडपडू लागला. निराशेच्या गर्तेत काही जण व्यसनी बनले, पण त्याच समाजाला काही शिकलेल्या आणि समाजातील उन्नतीच्या दिशेने नेणाऱ्या समाजसेवकांनी समाजातील मुलांना, तरुणांना शिक्षणासाठी भरभरून मदत केली आणि हा समाज शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होऊन आज समाजात मानाचे स्थान पटकावून आहे. लेखक हरवंदे यांनी आपल्या कादंबरीत सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीजवळील गावाच्या साळी समाजाच्या वस्तीचे आणि त्यांच्या हातमाग व्यवसायातील प्रावीण्याचे चित्र रंगवले आहे. हे केवळ त्या गावातील कुटुंबाचे चित्रण नाही, तर त्या अनुषंगाने वेदकाळा पूर्वीपासून या समाजाच्या वस्त्रोद्योग व्यवसायाची, एकंदर जडणघडणीची, इतिहासाची, सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक वस्त्रोद्योग कलेतील वाटचालीची आणि गुणदोषांसह व्यवसायावर ओढवलेल्या संकटाची कहाणी कादंबरी या माध्यमाचा आधार घेत लेखकाने प्रभावीपणे मांडली आहे.
सागरकिनारी असलेल्या या निसर्गरम्य गावाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आकार घेते. हा काळ साधारणतः 1920 च्या सुमाराचा आहे. या समाजाची वस्ती असलेल्या घराघरात त्यावेळी वस्त्र विणणाऱया हातमागाचं सटक-पटक संगीत ऐकू येत असे. वस्त्र कारागीरांचं कसब एखाद्या कलावंताच्या तोडीचं असे. लेखक तो गावातील काळ अक्षरशः आपल्या लेखन सामर्थ्याने जिवंत करतो. गावगाडय़ातील या समाजाच्या कर्तृत्वाचा विस्तृत पट त्यांच्या व्यवसायाच्या बारकाव्यांसह व्यक्तिरेखांच्या तोंडून बोलण्याच्या ओघात मांडत जातो. या समाजातील हातमाग व्यावसायिक कलावंतांचे गुण त्याने घराघरातील कुटुंबाच्या बोलीभाषेत प्रभावीपणे मांडले आहेत. त्यातून एकीकडे या व्यवसायातील एका कुटुंबाची काल्पनिक कथा साकार होत असताना दुसरीकडे त्या हातमाग व्यवसायातील वस्त्र विणण्याच्या कलेचे मर्म ते अलगदपणे कथानकाच्या ओघात कसं उलगडत जातात ते पाहण्यासारखं आहे. त्यांच्या मनोगतातून या हातमाग कलेच्या परंपरेपासून आताच्या परिस्थितीपर्यंत इत्थंभूत माहिती मिळते. या समाजाच्या हिंदुस्थानातील आणि महाराष्ट्रातील पोटजाती लक्षात येतात.
वस्त्र विणताना उभा धागा म्हणजे ताणा आणि आडवा धागा म्हणजे बाणा. ताणाबाणा एकत्र गुंफले की, वस्त्र निर्माण होते. माणसाच्या आयुष्यातही ताणाबाणा असतो. त्यामुळे आयुष्याचं विणकामही सुबक आणि राखीव होते, असे ते सांगतात. या समाजाची वाटचाल कादंबरीच्या स्वरूपात मांडताना ते गाव, कुटुंब, त्यांचे नातेवाईक, भोवतालचं सांस्कृतिक वातावरण, सण-उत्सव आनंदात साजरे करण्याची प्रवृत्ती यातून या हातमागावर वस्त्र विणणाऱया समाजाचं दर्शन घडावं हा त्यांचा हेतू नक्कीच सफल झाला आहे. कादंबरीला कोकणातील रम्य निसर्गाची पार्श्वभूमी आहेच. त्याशिवाय गावातील भक्तिमय वातावरण, कुटुंबातील सलोखा आणि मतभेद यासारख्या सर्वत्र आढळणाऱ्या मानवी छटा इथेही दिसतात. त्यांच्या व्यवसायाची परिभाषा ज्या घरात हे काम चालतं तिथे ऐकताना एका वेगळय़ाच विणकरांच्या संस्कृतीचं दर्शन घडतं. कादंबरीतील मानवी स्वभावाच्या छटा, त्यांच्या भावभावना, व्यवसायावर असलेलं त्यांचं प्रेम आणि वस्त्र विणण्याच्या कलेतील प्रभुत्व, त्यांच्या बोलीभाषेतील गोडवा यांसारख्या गोष्टी प्रकर्षाने कादंबरीला उठाव देतात. यानिमित्ताने वस्त्रविषयक कलेचा इतिहास, त्यात होत गेलेली उक्रांती आणि त्याचे मूळ व्यवसायावर झालेले परिणाम विशद करताना हिंदुस्थान आणि जगभराचे दाखले कादंबरीत येऊन जातात. संत कबीराच्या दोह्यातील वस्त्र विणण्याच्या रूपकाचं महत्त्व लेखक पटवून देतो. ‘सूत काता, रंगवा आणि विणा अशा अर्थातील ऋग्वेदातील मंत्राचे दाखले देतो. या साऱयातून आपल्या पिढीजात व्यवसायाच्या श्रेष्ठत्वाची महती असते. निदान त्याच्या आठवणी तरी ताज्या करण्याचा ध्यास असतो.
यंत्रमागाच्या कापड गिरण्या मुंबईसह महाराष्ट्रात जिकडे तिकडे सुरू झाल्यावर हातमागाच्या व्यवसायाला आलेली अवकळा आणि त्याचे गावावर झालेले परिणाम व्यक्तिरेखांच्या अस्वस्थतेतून दिसतात. वस्त्र आणि पर्यायाने त्याच्याशी या समाजाचे असलेले अतूट ऋणानुबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखकाने या कादंबरीत मनापासून केला आहे. कादंबरी वाचताना वस्त्रोद्योगाच्या एका वेगळय़ा जगाचं दर्शन मात्र निश्चित घडतं.
ताणाबाणा
लेखक -आदिनाथ हरवंदे
प्रकाशक – प्रफुल्लता प्रकाशन
पृष्ठ – 231. मूल्य – 240 रुपये





























































