
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेत टीम इंडियाला एक झटका बसला आहे. या मालिकेतून टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. बुमराह या मालिकेत किमान दोन सामने खेळेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. पण, आता तो या मालिकेतून बाहेर पडला आहे.
बुमराह हा सध्या दुखापतीतून सावरला आहे. तो नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत उपचार घेत आहे. त्याने गोलंदाजीला सुरुवातही केली आहे. पण, टीम इंडियाच्या व्यवस्थापक मंडळाला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे बुमराह याला कसोटी मालिकेबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, कसोटी मालिकेतून तो बाहेर असला तरी त्यानंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत मात्र तो खेळणार आहे.
टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, बुमराह सध्या एनसीएमध्ये गोलंदाजीचा सराव करत असून त्याचं प्रदर्शन उत्तम आहे. त्याच्या दुखापतीतही आराम पडला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याची निवड करणअयात आली होती. त्याने त्यासाठी सरावही सुरू केला होता. पण, आता तो या मालिकेत खेळणार नसल्याचं निश्चित झालं आहे.



























































