ब्राझिलच कतार जिंकणार, स्टॅटस् परफॉर्म्सचा अनोखा अंदाज

2002 सालापासून ब्राझिलचा संघ फिफा वर्ल्ड कपचे चुंबन घेऊ शकला नसला तरी 2022 मध्ये त्यांची कामगिरी 20 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणेल, असे भाकित ‘स्टेटस् परफॉर्म्स’ या संस्थेने वर्तवले आहे. या संस्थेने संघाची सध्याची कामगिरी, विश्वचषकातील त्यांचा इतिहास, स्पर्धेत त्यांच्याविरुद्ध खेळणाऱया संघांचा कामगिरी यांची सर्व आकडेवारी जुळवून काढलेल्या अंदाजात ब्राझिल संघ सर्वात वरच्या स्थानावर आहे. ‘स्टॅटस् परफॉर्म्स’ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्ल्ड कप अंदाज हे मॉडेल वापरून काढलेल्या आकडेवारीत दक्षिण अमेरिकन संघ सहाव्यांदा फिफा वर्ल्ड कप उंचावणार असल्याचे दिसून आले आहे.

‘स्टॅट्स परफॉर्म्स’नेही अंदाज बांधताना एकच नव्हे तर अनेक गोष्टींचा अभ्यास केला आहे. यात कोणत्या संघावर किती सट्टा लागला आहे, फुटबॉलप्रेमींची पहिली पसंती कोणाला आहे, संघांसाठी असलेला ड्रॉ किती फायदेशीर ठरेल या सर्वांचे बारीक निरीक्षण केल्यानंतर काढलेल्या आकडेवारीत सर्वाधिक 15.8 टक्के ब्राझिलला मिळाले आहे. हाच संघ अंतिम सामन्यात बाजी मारेल, असा अंदाज आहे. तसेच दुसऱया स्थानावर त्यांचा शेजारी राष्ट्र असलेल्या अर्जेंटिनाच्या जगज्जेतेपदाची शक्यता 12.6 टक्के असल्याचाही अंदाज त्यात वर्तविण्यात आला आहे. या टक्केवारीत फ्रान्सला तिसरे तर चौथे स्थान स्पेनला देण्यात आले आहे. या आकडेवारीत त्यांनी कोणते 16 संघ बाद फेरीत पोहोचतील याचीसुद्धा आकडेवारी दिली आहे.

ब्राझिल, अर्जेंटिना , स्पेन आणि फ्रान्सला उपांत्य फेरीसाठी पसंती

सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्लंड, जर्मनी, नेदरलॅण्ड्स आणि पोर्तुगाल हे अन्य चार संघही उपांत्यपूर्व फेरीत खेळणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच त्यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार ब्राझिल, अर्जेंटिना , स्पेन आणि फ्रान्स या चार संघांना उपांत्य फेरीत पोहोचण्याची अधिक संधी असेल, असेही ‘स्टेट्स परफॉर्म्स’च्या अंदाजात म्हटले आहे.