Breaking – नाशिक येथे खासगी बसला भीषण अपघात, बसने पेट घेतल्याने 11 जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमधील नांदूर नाक्याजवळ एका खासगी बसला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतला असून त्या आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. ही बस चिंतामणी ट्रॅव्हल्सची आहे. या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

ही बस यवतमाळवरून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान नाशिकमधील नांदूर नाक्याजवळ या बसची एका ट्रेलरसोबत धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की बसने धडकेनंतर तत्काळ पेट घेतला. त्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर देखील पडता आले नाही.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातानंतर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत  जाहीर केली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला शोक

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ”नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो” असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.