‘बॉर्डर’चा हीरो गेला; ब्रिगेडियर कुलदीपसिंह चांदपुरी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
कुलदीपसिंह चांदपुरी, पाकिस्तानी सैन्याला नामोहरम करणारे ब्रिगेडिअर

सामना ऑनलाईन । मोहाली

बोटावर मोजण्याएवढय़ा बहाद्दर सैनिकांच्या मदतीने दोन हजार पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा उडवणारे कर्तबगार ब्रिगेडियर कुलदीपसिंह चांदपुरी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. या भीमपराक्रमासाठी चांदपुरी यांना महावीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. लोंगोवालच्या याच युद्धावर ‘बॉर्डर’ हा गाजलेला सिनेमा बनवण्यात आला होता.

कुलदीपसिंह चांदपुरी यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1940 रोजी गुर्जर शीख परिवारात झाला. 1962 मध्ये त्यांनी होशियारपूर येथील गव्हर्मेंट कॉलेजातून पदवी घेतली. याच वर्षी ते हिंदुस्थानी लष्करात भरती झाले. 1963 मध्ये त्यांना पंजाब रेजिमेंटच्या 23 व्या बटालियनमध्ये कमिशन देण्यात आले. कुलदीपसिंह लष्करात भरती झाले तेव्हाच हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात युद्धाचे वारे वाहत होते. 1965 मध्ये युद्धाचे नगारे वाजले. या युद्धात त्यांनी आपले कसब दाखवले.

‘लोंगेवाला बॅटल’वर काढण्यात आला होता ‘बॉर्डर’ चित्रपट

1971 च्या युद्धात राजस्थान येथील लोंगेवाला सीमेवर पाकिस्तानकडून 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री हल्ला चढविण्यात आला होता. यावेळी पंजाब रेजिमेंटच्या तुकडीचे नेतृत्व कुलदीप सिंग यांनी केले होते.राजस्थान सीमेवर पाकिस्तानी फौजांशी लढताना आवश्यक कुमक येईपर्यंत आपल्या शंभर सहकाऱयांसह दोन हजार पाकिस्तानी सैनिकांना रोखण्याचा पराक्रम करीत  मेजर पदावर असणाऱया कुलदीप सिंग यांनी पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन गनिमी काव्याने शत्रूवर विजय मिळवला. चित्रपट निर्माते जे. पी. दत्ता यांनी कुलदीप यांच्या या पराक्रमी अभियानावर आधारित ‘बॉर्डर’ चित्रपटाची निर्मिती केली.