
सामना प्रतिनिधी। मालवण
मालवण तालुक्यातील बिळवस येथील बीएसएनएलचे एक्सचेंज बंद पडल्याने आंगणेवाडी, बिळवस, भोगलेवाडी, माळगाव, महान, कांदळगाव या भागातील दूरध्वनी व इंटरनेट सेवा गेले दहा दिवस ठप्प झाली आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी बीएसएनएल कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी सात दिवसात सेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी बीएसएनएलला दिला.
बिळवस एक्सचेंज बंद असल्याने गावांमध्ये दूरध्वनी व इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. याबाबत पाच दिवसांपूर्वी बीएसएनएलला कळवण्यात आले होते. पण त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तर दुसरीकडे ९० टक्के सेवा बंद असताना टेलिफोन बिले मात्र बीएसएनएल कडून वसूल केली जात आहेत. ग्राहक पूर्ण रक्कम भरत असताना गरजेच्या वेळी सेवा मिळत नसेल तर उपयोग काय ? पावसात इतर कंपन्यांची सेवा सुरळीत सुरू असताना बीएसएनएलचीच सेवाच ठप्प का होते?असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. तसेच याभागातील अनेक ग्राहकांचे टेलिफोन संच नादुरुस्त झाले असून तेही दुरुस्त अथवा नवीन देण्यात आलेले नाहीत. बिळवस एक्सचेंजवर काम करण्यास एकही सक्षम कर्मचारी उपलब्ध नाही. तर प्रभारी म्हणून नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे कोणतेही प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून होत नसल्याने ग्राहकांच्या अडचणीच वाढ झाली आहे.
बिळवस एक्सचेंज बंदच करणार ?
बिळवस एक्सचेंज बंद करणार येणार असल्याची चर्चा सुरू असून हे एक्सचेंज बंद केल्यास बीएसएनएल अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागेल. एक्सचेंज बंद करण्याबाबत कोणत्याही हालचाली करण्यात आल्यास आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. असा आक्रमक इशारा यावेळी ग्रामस्थांनी बीएसएनएलला दिला आहे.




























































