
मुंबईत विविध प्रकल्प आणि निर्माणाधीन इमारतींमुळे आधीच प्रदूषणाची गंभीर समस्या असताना विकासकाने नव्या इमारतीसमोरील फुटपाथवर असलेल्या जिवंत झाडाचा अडथळा दूर करण्यासाठी झाडावर विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेने याची गंभीर दखल घेतली असून विषप्रयोग करणाऱ्या विकासकावर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार महापालिकेच्या के-पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना राज्य प्रदूषण मंडळ आणि मुंबई महापालिकेकडून सुरू आहेत. मात्र, झाडांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेला विकासकांच्या मनमानीला लगाम घालता आलेला नाही. नवीन इमारतींच्या बांधकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडांवर सर्रास विषप्रयोग करण्यापर्यंतची मजल विकासकांनी मारली आहे. विलेपार्ले येथील सुभाष रोडवर ‘ग्लॅड क्वेस्ट’ या इमारतीचे काम सुरू असून येथील फुटपाथवर अनेक वर्षांपासून असलेल्या मोठय़ा झाडावर विषप्रयोग केला आहे. विषप्रयोगामुळे हे झाड पूर्णपणे सुकून गेले आहे. आधीच प्रदूषण असताना त्यात ऑक्सिजन देणाऱ्या या हरित सैनिकांना मारण्याचे काम विकासकांकडून करण्यात येत आहे. अशा विकासकांना जरब बसेल अशी कारवाई करावी त्याचबरोबर महापालिकेने तिथे नवीन झाडाचे रोपण करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी पालिकेकडे केली आहे.
विकासकांना लगाम घाला!
झाडावर विषप्रयोग करणाऱ्या विकासकाविरोधात रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. विकासकाच्या मनमानीला आळा घाला. मुंबई महापालिकेने दुटप्पी भूमिका घेऊ नये, विकासकांवर तातडीने कठोर कारवाई करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी विलेपार्लेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे.





























































