ज्येष्ठ प्रवाशाला लुटणारा कॅबचालक अटकेत, सोन्याची चैन, मोबाईलसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

कॅबमधून प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरिकाला जबरदस्तीने लुटणार्‍या कॅबचालकाला सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने अटक केली. कॅबचालक आणि त्याच्या साथीदाराने जेष्ठाकडून जबरदस्तीने एटीएमचा पीन नंबर माहिती करून पैसे काढले. या पैशातून महागडा आयफोन, सोन्याची चैन खरेदी केली. पोलिसांनी आरोपीकडून 7 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कृष्णा उत्तम सोनवणे (22, रा. पार्वती हौसिंग सोसायटी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. 2 ऑक्टोंबर रोजी ही घटना घडली होती. याबाबत 77 वर्षीय ज्येष्ठाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी हे मुंबईचे रहीवासी असून कामानिमित्ताने पुण्यात आले होते. येथे आल्यानंतर त्यांनी कॅब बुक केली. कॅबचालक सोनवणे यांनी फिर्यादीला कॅबमधून फिरवीले. काही वेळानंतर सोनवणे याचा साथीदार श्रीधर साहू आणि अन्य एकजण कॅबमध्ये बसले. यानंतर तिघांनी मिळून ज्येष्ठ नागरिकाकडून जबरदस्तीने एटीएम कार्ड घेत त्याचा पीन नंबर माहिती करून घेतला. त्यानंतर ज्येष्ठाच्या बँक खात्यातून काढलेल्या पैशातून 80 हजारांचा आयफोन, एक लाखांची सोन्याची चैन, दुचाकी खरेदी केली. याबाबत ज्येष्ठाने दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता.
या दरम्यान गुन्ह्यातील कॅबचालक हा नवले पुलाखाली असल्याची माहिती तपास पथकाचे सहायक निरीक्षक सचिन निकम, शिपाई अविनाश कोंडे यांच्या पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून आयफोन, सोन्याची चैन, दुचाकी तसेच गुन्ह्यातील चारचाकी असा तब्बल 7 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचा साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक निरीक्षक सचिन निकम, हवालदार संजय शिंदे, अमित बोडरे, देवा चव्हाण, सागर शेडगे, स्वप्नील मगर, शिवाजी क्षीरसागर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.