
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पहिल्यावहिल्या ‘महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी’ स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील दिग्गज कॅरमपटूंपुढे देशभरातील 18 राज्यांमधून आलेल्या शेकडो चॅलेंजर्सचे कडवे आव्हान असेल. येत्या 13 ते 16 फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱया या स्पर्धेत तब्बल 503 खेळाडू स्ट्रायकर हातात घेणार असून विजेत्याच्या चॅलेंजर्स ट्रॉफीवर आणि दीड लाखाच्या इनामावर सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
फक्त पुरुषांमध्ये खेळल्या जाणाऱया या एकेरी स्पर्धेचे दिमाखदार आयोजन छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अॅण्ड गाईड हॉलमध्ये केले जाणार आहे. कॅरम खेळाच्या इतिहासात ही स्पर्धा सर्वोच्च गणली जाणार असून या स्पर्धेतील विजेत्यांवर 7 लाखांपेक्षा अधिक रोख रकमांचा वर्षाव केला जाणार आहे. कॅरम स्पर्धेत प्रथमच विजेता दीड लाखाचा मान मिळवणार असून उपविजेताही लखपती होणार असल्यामुळे या स्पर्धेचे चॅलेंज सर्वांनीच स्वीकारले आहे. एपंदर 32 खेळाडूंना रोख पुरस्कार दिले जाणार असून ब्रेक टू फिनीश आणि ब्लॅक टू फिनीशच्या विजेत्यांमुळे बक्षिसांची रक्कम 8 लाखांच्या घरात जाणार असल्याची माहिती संघटनेने दिली.
या विक्रमी स्पर्धेसाठी कॅरमच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. ते फक्त या स्पर्धेपुरतेच मर्यादित असतील. श्रीलंका, मालदीव, सिंगापूर या देशांव्यतिरिक्त हिंदुस्थानच्या 18 राज्यांतील एकूण 503 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. हिंदुस्थानचे प्रशांत मोरे, योगेश परदेशी, संदीप दिवे असे तारांकित तसेच विश्वविजेते कॅरमपटू या स्पर्धेत दिसणार आहेत. तसेच अन्य राज्यांतील तसेच देशांतील महिलांचा अधिक प्रतिसाद लाभला, तर पुढील वेळेस महिलांसाठीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे संघटनेचे सचिव अरुण केदार यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.



























































