परीक्षेसंबंधी खोटी माहिती पसरविल्यास कारवाई, सीबीएसई बोर्डाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱया दहावी, बारावीच्या परीक्षा आज 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. देशभरातून या परीक्षेसाठी सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची खोटी माहिती पसरवण्यात दोषी आढळल्यास अशा व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा बोर्डाने दिला आहे.

सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल दरम्यान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पेपर लीक झालेत किंवा परीक्षेच्या तारखा, वेळा बदलल्या आहेत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे बोर्डाने सूचित केले आहे. अशा अफवा पसरवणाऱयांवर तसेच पेपर फुटल्याचा खोटा दावा करून परीक्षेच्या वेळी अनेक सोशल मीडिया साइट्स किंवा ग्रूप्सवर पेपर व्हायरल केले जातात. अनेक गट प्रश्नपत्रिकेसाठी पैशांची मागणीही करतात. अशा कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही बोर्डाने दिला आहे.

सीबीएसई बोर्ड अशा घटनांवर नजर ठेवून आहे. या असामाजिक घटकांवर विविध कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. तसेच बोर्डाने विद्यार्थ्यांनादेखील इशारा दिला असून परीक्षांबाबत कोणत्याही प्रकारची खोटी बातमी पसरवण्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे.