
आदिती सारंगधर
ब्रुनो आणि शुभवी लोकेश गुप्ते…
दोघंही बहीण भाऊ… परस्परांमधील निरागस नातं दोघंही तितक्याच प्रेमाने निभावतात…
‘‘एक सांगायचंय..’चं खूप हेक्टीक शेडय़ुल सुरू आहे गं… रिलीज जवळ आलीय. कसं गं भेटायचं…? पण फोनवर बोलूयाच…’ लोकेशने डायरेक्ट केलेली, लिहिलेली, संकल्पना असणारी पहिली फिल्म त्याची… शुभवी (मुलगी) चित्रपटाद्वारे पदार्पण करतेय. आईची दिवाळीपेक्षाही जास्त होणारी धावपळ आणि धामधूम कळूच शकतेय. पण एकतर प्राण्यांवर प्रचंड प्रेम करणारी फॅमिली आणि घरी असणाऱया गोजिरवाण्यासाठी जीव टाकणारी… सो, मला हवेच होते सगळे ‘जिवलग’साठी.
फोनवर बोलायचं ठरवलं. फोन केला तर अत्यंत गोड, शांत, पण अनोळखी आवाज कानावर पडला. ‘हाय…’ शुभवी? बापरे.. मला मुलगी झाली एवढंच लोकेशने एका सेटवर सांगितलं होतं. आता इतक्या वर्षांनी इतकं मॅच्युअर्ड बोलणारं हे तेच बाळ का? छान वाटलं. ‘अदितीताई, ऍक्चुअली मी मुंबईत आईबाबांबरोबर राहायला आले तेव्हा मला कुत्रा प्रकरणाची खूपच भीती वाटायची. इतकी की रस्त्यात कुत्रा आला तर मी रस्ता बदलायचे. पण मग बिल्डींगमधल्या मित्रमंडळींबरोबर खाली खेळायला जायचे तेव्हा एक डॉगी होता. त्याच्याशी इतकी दोस्ती, इतकं बॉण्डिंग झालं होतं… मग घरी एक डॉग आणावासा वाटायला लागलं. पण आईला कोण समजावणार? सांगणार? मग ठरलं. शोधायला तर सुरुवात करूया… म्हणून मी आणि बाबानी इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली. आईला न सांगताच बिगल किंवा लॅबरेडॉर घ्यायचा असं शोधमोहिमेअंती ठरलं. बिगल तर काही नाही मिळालं चांगलं… मग मुंबई लॅबरेडॉर नावाच्या साईटवर 2 ते 3 आवडले. पण फायनल करण्याच्या आधीच मी झोपले. काही दिवसांनी मी मैत्रिणींबरोबर खेळत होते बाहेर. मला सांभाळणारी ताई धावत आली आणि म्हणाली, ‘चल पटकन तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आलंय. मी धाव्वत खाली आले तर घरात दोन दोन इटुकली पिटुकली लॅबची पिल्लं… एक अतिशय वळवळत होतं. येऊन येऊन चाटत होतं. दुसरं शांतपणे घराचा अंदाज घेत फिरत होतं. कुणाला इथे राहायचंय? असं विचारल्यावर ते धावत आलं माझ्याकडे आणि पाय चाटायला लागलं. सो… सो क्यूट. आणि अशा तऱहेने ब्रुनो रावांचं आमच्या घरात आगमन झालं. पण… आई तर घरात नव्हतीच. आता काय… म्हणून खूप प्लानिंग वगैरे करून आम्ही आईला सेटवर पिकअप करायला गेलो. आई शूटिंग स्टुडिओ खाली आली. गाडीत बसली. गाडी सुरू केली बाबांनी आणि आ…ई म्हणून पटकन ब्रुनो आमचा चिंगू तिच्या मांडीवर ठेवला तिला काही कळायच्या आधीच… ‘तुम्ही मला न सांगता घेतलात पण. काय रे? धन्य आहे तुमची… म्हणता म्हणता ब्रुनोने आईला चाटलं आणि आईने त्याचा पापा घेतला. चला… युद्ध तिथेच टळलं.’
‘मला फक्त टेन्शन होतं ब्रुनो कसा राहील याचं. त्याची जबाबदारी जर आम्ही घेतली तर 100 टक्के किंबहुना त्यापेक्षाही जास्त टक्क्याने ती पार पाडायचं. कारण मी आणि लोकेश दोघेही शूटिंगमध्ये होतो. शुभवी पण फिल्म स्कूलमध्ये बिझी. तिला सांभाळणारी मुलगी आता ब्रुनोला सांभाळणारी मुलगी झाली आणि आमच्या फॅमिलीमध्ये आलेला हा नवीन मेंबर घरात स्थिरावला. 21 जून 2015 ला आला ब्रुनो घरी.’
आपलं बाळ 6 महिन्यांचं झालं की वरणाचं पाणी, खिमटी सुरू करायचं ऐकलेलं तरी असतं, पण त्या संगोपनात सगळं डॉक्टरकडून समजून घ्यायचं असतं. मग पेडीग्रीच्या बॅग्ज आमच्या आयुष्यात आल्या. सीकेपी गुप्तेंकडे… आई,बाबा, शुभवी गुप्ते यांच्या चिकनबरोबरच ब्रुनो गुप्तेसाठी चिकन यायला लागलं. स्टीक्स आणि ट्रीट्स यायला लागल्या. अनेक प्रकारची खेळणी यायला लागली. ब्रुनोच्या सोयीने आळीपाळीने आम्ही घरात थांबायला लागलो. त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळत धावत घरी यायला लागलो. लाइफ जस्ट एंगेज्ड…
‘आमचं हे टोणगं पिल्लू आहे एक नंबर डांबरट. सेंटर ऑफ अट्रक्शन असायचं असतं त्याला सतत… मग बाहेरचे कुणी आलं की आपण त्यांच्याशी बोलायला लागल्यावर येऊन पायात घुटमळणार… काही फार भाव दिला नाही तर अंगावर पंजे ठेवून उभा राहणार… जाऊ तेथे मागे येणार, चेहरा चाटायला येणार… मग दोन मिनिटे दुनियेला स्टॅच्यू करायचं… याचं काय ते म्हणणं ऐकून घ्यायचं… आणि मग पुढे सुरू करायचं. त्याचा तो एक हिरव्या रंगाचा बॉल आहे. आपण आणि तो, दोघे दमेपर्यंत त्याचा बॉल फेकायचा. तो धावत जाऊन उचलून आणणार. आपण बॉल घेऊन पळायचं. तो आपल्याला पकडणार. हे सुरूच ठेवायचं. अरे थांब… असं होतं आपलं, पण साहेब काही थांबत नाहीत.’
‘एकदा माझे सगळे स्कूल फ्रेण्ड्स आले होते घरी. आम्ही कोल्ड ड्रिंकची बाटली चुक्कून उघडी ठेवली होती आणि बेडवर बसलो होतो. याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतंय म्हणून चिडला… आला आणि रागाने बॉटल उलटी केली. सगळं कोल्ड ड्रिंक गादीनं प्यायलं. आणि मी आईचा ओरडा… अश्शी चिडले होते ना त्याच्यावर… भांडले मी त्याच्याशी तर शहाणा भू भू वेगवेगळ्या स्वरात भुंकून आर्ग्यू करत होता माझ्याशी… शेवटी अश्शी ओरडले ना त्याला… मग जाऊन सोफ्याखाली बसला रुसून… बोलावलं तरी येईना… मग जाऊन मिठी मारली तेव्हा शहाण्याचा राग गेला.’
‘पण तितकाच प्रोटेक्टीव्ह, पझेसिव्ह आहे हं तो शुभवीच्या बाबतीत…’ चैत्राली म्हणाली. ‘एकदा अगं कुरीयर घेऊन मुलगा आला. शुभवी एकटी असताना बेल वाजली. तसा हा धावला. जनरली मागे बस म्हटल्यावर तो बसतो, पण दरवाजा उघडला तसा त्या मुलाच्या अंगावर गेला. नको म्हटलं तरी उडय़ा मारतच राहिला. त्याला कळलं, ताई एकटी असताना कुणीही असं आत येता कामा नये, ही माझी जबाबदारी समजून जणू प्रोटेक्ट केलं गं त्याने…’
ही इज अ हॅण्डसम मेन्टेन्ड चॅम्प… दिवसातून दोनवेळा अर्धा तास खाली वॉक नाही, धावायलाच जातो. आमचा वॉकर फुल्ल फुल्ल वर्कआऊट करून आणतो. मग आल्यावर हॅ हॅ करत झोपायचं. कितीतरी वेळ. पेडीग्री किंवा चिकन भाकरी (तांदळाची), दही भात, भाकरी हे आमचं स्टेपल फूड, पण त्यातही आम्हाला कंटाळा वगैरे येतो हं… अनेक दिवस चिकन खाल्ल्यावर नको असतं चिकन. ते खातच नाही. मग चेंज करा जेवण… आणि अगं ‘वदनी कवळ घेता’ म्हटल्याशिवाय आम्ही जेवणाला हात नाही लावत. मग कधीकधी जेवण वाढलं तरी बघत राहातो आपल्या तोंडाकडे. विसरले तर पंजा मारून सांगतो, ‘अगं बाई म्हण की आता मला भूक लागलीय..’ घरभर धावायला फिरायला आवडतं. आम्हीसुद्धा त्याला कधीच बांधून ठेवत नाही. पण खूप हट्टी आहे तो अगं, मग अशावेळी आमचं ऐकलं नाही की बाबा… लोकेशने त्याला डायरेक्ट ओरडलं तर नाही भाव देत तो… पण लोकेश जोरात मला किंवा शुभवीला ओरडतो तेव्हा मग त्याला कळतं वातावरण तापलेलं आहे. आपण चुकलोय बहुतेक… आणि गप्प जाऊन सोफ्याकडे बसतो. ‘लेकी बोले सुने लागे’ खरं तर कसलं सुने लागे… 10 मिनिटांत पुन्हा मस्ती सुरू.’
‘अगं एकदा शूटिंग सुरू होतं. दोन, अडीच, तीन वाजायचे घरी यायला. एकटा ब्रुनो दरवाजा उघडला की धावत यायचा, घट्ट बिलगायचा. कितीही सांगितलं तू झोप, तरी मागे मागे फिरायचा मी पाठ टेकेपर्यंत. तेव्हा खूप खूप भरून यायचं. माझ्यावर निरपेक्ष खरंच निरपेक्ष प्रेम करणारं आपलं पिल्लू…’
‘मदर्स डेला मला मिळालेलं गिफ्ट… तेव्हा जबाबदारी झेपेल की नाही या भीतीने मी जरा बावरले होते. पण आज 3 वर्षांनी वाटतंय बरं झालं पिल्लू आलं… पुन्हा एकदा मला माझं आईपण अनुभवायला मिळालं. दुडूदुडू धावणारी चिमुकली पावलं… ते पंजा हा प्रवास बघताना वाटतंय, मोठ्ठी झाली गं आता माझी दोन्ही मुलं..!’
























































