मध्य रेल्वेच्या एसी लोकलला सुमारे तीन महिन्यांत 20 लाखांची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर सुरू केलेल्या एसी लोकलला सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत 20 लाख 67 हजार 266 रुपयांची कमाई झाली आहे. या काळात एसी लोकलला 50 हजार 161 प्रवासी लाभले, तर 3 हजार 257 तिकीट आणि पासची विक्री झाली आहे.

मध्य रेल्वेने मेन लाइनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या धिम्या मार्गावर 17 डिसेंबरपासून आपली दुसरी एसी लोकल प्रारंभ केली आहे. मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल ठाणे ते वाशी-पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर सुरू झाली होती, परंतु लॉकडाऊननंतर अजून ट्रान्सहार्बरवरील एसी लोकल पुन्हा सेवेत रुजू झालेली नाही. 17 डिसेंबर ते 16 मार्च या सुमारे तीन महिन्यांत मध्य रेल्वेला एसी लोकलमुळे 20 लाख 67 हजार 266 रुपयांची कमाई झाली असून त्यात तिकीट विक्रीतून 3 लाख 81 हजार 161 तर सिझन पास विक्रीतून सुमारे 16 लाख 43 हजार रुपयांची कमाई झाली आहे.