
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकाने बुधवारी गंगापूर तालुक्यातील सुलतानपूर आणि मुरमीतील शेतकऱ्यांशी संवाद साधून किरकोळ गोष्टीचीही माहिती घेतली. या सोबतच राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारला दिलेल्या अहवालाची सत्यताही त्यांनी पाडताळून पाहिली.
इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाऱ्या पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छवी झा असून या पथकामध्ये कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए. के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना, केंद्रीय जलसमितीचे संचालक आर. डी. देशपांडे यांचा समावेश आहे. या पाहणीदरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्याला निघण्यापूर्वी पथकातील अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तासभर बैठक घेतली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी त्यांना मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात माहिती
दिली. यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजता पथक गंगापूरकडे रवाना झाले. राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी पैसेवारी अहवाल, पाऊस, पाणीसाठा यासह वनस्पती स्थिती निर्देशांक, मृद आद्र्रता, सत्यापन (ग्राउंड ट्रुथिंग) आदी विविध निकष लावले होते. प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचे सत्यापन (ग्राउंड ट्रुथिंग) केल्यानंतर आलेल्या निष्कर्षाआधारे राज्यातील १५१ तालुके आणि २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. ग्राउंड ट्रुथिंग झालेल्या गावांपैकीच काही गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन राज्य शासनाच्या अहवालातील सत्यता पडताळली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील एकंदरीत पाणीटंचाई, पिकांची अवस्था यासोबतच टेंभापुरी डॅमबाबत पथकाला माहिती दिली. पथकाने यावेळी गांवकऱ्यांशी संवाद साधला. सरपंच संतोष जाधव यांनी गावातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, कमी पावसामुळे कापूस, मका, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या पिण्यासाठी देखील पाणी नाही. या डॅममध्ये खाम नदी, नांदूर मधमेश्वर तसेच जायकवाडीवरुन उपसा सिंचनद्वारे पाणी आणणे शक्य आहे, ज्यामुळे गावातील पाण्याचे दुर्भिक्ष संपू शकेल. मुरमी गावचे सरपंच विक्रम राऊत यांनी यावेळी गावातील परिस्थितीची पथकाला माहिती देताना सांगितले की, गावात जलयुक्तच्या कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत, मात्र पाऊस कमी झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. जनावरांसाठी चारा लवकर उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरुन पशुधन वाचेल अशी कैफियत त्यांनी यावेळी केली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी जिल्ह्यात शेततळ्यांची आणि जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असून जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रयत्न करत असून लवकरच चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे देवयानी डोणगावकर यांनी यावेळी सांगितले.
सुलतानपूर येथील शेख बाबुलाल शेख अहमद यांच्या शेतावर जाऊन पथकाने तूर आणि कापूस पिकाची पाहणी केली. पाहणीनंतर पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
टेंभापुरी प्रकल्प
गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पाची पथकाने पाहणी केली. प्रकल्पाच्या क्षेत्रफळ किती आहे, या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी केली जाते, या परिसरात कोणती पिके घेतल्या गेली. क्रॉप पॅटर्न कसा आहे, आदी विविध प्रश्न उपस्थित करुन छावी झा यांनी ग्रामस्थांकडून माहिती घेतली.
उदरनिर्वाहासाठी रोजगाराची शोधाशोध; सुलतानपूरवासीयांनी मांडली कैफियत
पावसाने दगा दिल्याने उभी पिके जळून गेली आहेत. त्यामुळे यंदा धान्याचे उत्पादन झाले नाही. कापूस, तूर पिके हातून गेली आहेत. उसाची वाढही खुंटली आहे. घरात दहा-बारा सदस्य आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आता औद्योगिक वसाहतीत रोजगाराची शोधाशोध करुन काम मिळविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मनरेगाचे एकही काम सुरू नाही, या कामावर मजुरी कमी मिळत असल्याने एमआयडीसीकडे कल वाढला आहे. दुष्काळी मदत म्हणून आता शासनाकडूनच अपेक्षा आहेत, अशी कैफियत सुलतानपूरच्या ग्रामस्थांनी मांडली.
































































