‘नाळ’मुळे झाला घोळ, अपहरणाच्या अफवेने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chaitanya-kendre-naal-effect

उदय जोशी । बीड

नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटाने लहान मुलांवर गारुड निर्माण केले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अंबाजोगाई येथील एका शाळकरी मुलाने शक्कल लढवली. दप्तर घेऊन शाळेमध्ये निघालेला हा मुलगा शाळेत न जाता मित्रासोबत थेट लातूरकडे निघाला. अंबाजोगाई येथील शाळेतील मुलगा मोटरसायकलवर बसून लातूरकडे निघालेला पाहून त्याचे अपहरण झाले की काय असा संशय एका व्यक्तीला आला. त्याने थेट पोलीस ठाण्याला फोन केला आणि अंबाजोगाई शहरामध्ये एकच खळबळ उडाली.

अंबाजोगाई शहरातील शासकीय गुत्तेदार बाळासाहेब केंद्रे यांचा चैतन्य वय 13 वर्ष इयत्ता 8 वी मध्ये शिकतो. हा मुलगा आज सकाळी पावणे नऊ वाजता घरातून शाळेमध्ये जाण्यासाठी निघाला. पण शाळेत न जाता तो थेट मित्राच्या मोटारसायकलवर लातूरकडे निघाला आणि त्याचे अपहरण झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी तातडीने वायरलेस केले, यंत्रणा कामाला लागली आणि रेणापूर फाट्यावर या दोन मुलांना शिवाजी सिरसाट यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. ते अपहरण नव्हते तर तो चित्रपट पाहण्यासाठी गुपचूप निघाला होता. हे समजल्यावर थरकाप उडालेल्या अंबाजोगाई करांनी सुटकेचा श्वास सोडला. अंबाजोगाई आणि लातूर पोलिसांनी तत्परता दाखवून सत्य समोर आणले.