
शहरातील गुटखा, पान मसाला विक्रेत्यांवर पोलीसांनी छापे टाकून धडक कारवाई केली असून या कारवाईत 10 लाख 70 हजार मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जातेय .
यामध्ये चाकूर शहरात सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम व प्रभारी पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर शहरात गुटखा बहाद्दरांवर मोठी कार्यवाही करुन येथून गुटखा, पान मसाला, कार व ऑटो असा 4 लाख 92 हजार 820 रुपयांसह हाळी हंडरगुळी येथून गुटखा,पान मसाला असा 5 लाख 77 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम व प्रभारी पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या पथकाने सोसायटी चौकातील गंगाधर दशरथ सोमवंशी,राजेश्वर दशरथ सोमवंशी यांचे घरी व दुकानात दुपारी 2 ते 3.30 दरम्यान छापे मारून त्यांच्या घरुन विविध कंपनीच्या गुटखा व पान मसाला 58 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहमद इस्माईल लालूभाई शेख व गफुर इस्माईल लालूभाई शेख यांच्या घरी 4 ते 5 दरम्यान छापा मारून गुटखा व पान मसाला 1 लाख 23 हजार 170 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच रमन प्रल्हाद माने,तिरुमाल प्रल्हाद माने यांच्या घरी दुपारी छापे मारुन 2900 रु मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबरोबरच वरील लोकांकडून मिळालेल्या माहितीवरुन हाळी हंडारागुळी येथे पाच जणांच्या घरी छापे मारले असता ओमकार मल्लिकार्जुन काळवणे यांच्याकडून एकूण 30 हजार 360 रु.माल ,रोशन बाजीराव तांबोळी यांच्याकडे 3 लाख 71 हजार 25 रु मुद्देमाल, सीनिल तातेराव माचेवार यांच्याकडील 34 हजार 800 रु विष्णू जनार्धन हमदळे यांच्याकडून 75600 रु मुद्देमाल,रामदास निवृत्ती चिंतलवार यांच्याकडून 65 हजार 400 रु गुटखा,पान मसाला असा एकूण 5 लाख 80 हजार 075 रु गुटखा व पान मसाला एक कार व ऑटो किंमत 4 लाख 92हजार 820 असा एकूण 10 लाख 69 हजार 995 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर यातील कांही मोठे गुटखा विक्रेते पळून जाण्यात यशस्वी झाले.
या कार्यवाहीसाठी रेणापूर व शिरूर अनंतपाळ येथून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. या संयुक्त कार्यवाहीसाठी निकेतन कदम,अभयसिंह देशमुख यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नोसाद पठाण ,पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड, पोलीस हेड काँन्स्टेबल हणुमंत आरदवाड, सुकेश केंद्रे ,दत्ता थोरमोठे,शिवाजी सोनवणे,साहेबराव हाक्के यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी काम पाहिले



























































