
शाळेच्या आवारातील अडीचशे वर्षं जुनं झाड कोसळल्याने झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. ही घटना चंदिगढ येथील सेक्टर 9मधल्या कार्मल कॉन्वेंट स्कूल येथे घडली आहे.
शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमाराला या शाळेतील मुलांची मधली सुट्टी सुरू होती. त्यामुळे अनेक मुलं शाळेच्या आवारात होती. त्याच वेळी हे झाड कोसळलं. त्या खाली चिरडल्याने हिराक्षी (16) या दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
तिच्याखेरीज 19 मुलं देखील जखमी झाली. या मुलांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुलांचे पालक शाळेत दाखल झाले. त्यांना शाळेच्या गेटबाहेरच रोखण्यात आलं. त्यानंतर वादावादी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
या घटनेचा तपास करून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश चंदिगडचे उपायुक्त विनय प्रताप सिंह यांनी दिले आहेत. तसंच, चंदिगडच्या वनविभागाने एक समिती स्थापन करून शहरातील अन्य कोणत्याही शाळेत असा कोणताही अपघात पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

























































