
गुजरातमध्ये चांदिपुरा विषाणूने धोक्याची घंटा वाजवल्यानंतर मुंबई महापालिकेनेही तातडीने खबरदारीची पावले उचलली आहेत. सध्या मुंबईत या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नसला, तरी संभाव्य संकट ओळखून महापालिका ‘अलर्ट’ मोडवर आहे. संभाव्य रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी कस्तुरबा रुग्णालयात १० खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
गुजरातमधील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्य व केंद्र सरकार तसेच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राशी समन्वय वाढवला आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालये तसेच प्रयोगशाळांना संशयित रुग्णांबाबत विशेष सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
१५ वर्षांखालील मुलांना अधिक धोका!
चांदिपुरा विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. अचानक ताप, उलट्या, आकडी, गुंगी आणि मेंदूशी संबंधित गंभीर लक्षणे ही या आजाराची प्रमुख चिन्हे आहेत. त्यामुळे संशयित रुग्णांचे तातडीने निदान करून विलंब न लावता उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

























































