
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी या गावातील विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ भलताच वायरल झाला होता. शाळेत भरदुपारी येणारे शिक्षक आणि अभ्यासक्रम सोडून इतर काम करणारे गुरुजी यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी व्हिडीओत तक्रारी केल्या होत्या. ग्रामीण भागातील शिक्षणाची या व्हिडिओने पोलखोल केली. या व्हिडिओने शिक्षण विभागात खळबळ उडवून दिली होती.
या प्रकाराची चर्चा अद्याप थांबलेली नसताना दांडी बहाद्दर शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी रास्तारोको केल्याचा प्रकार पुढे आला आहे. जिल्हाचा शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील पाटागुडा शाळेतील विद्यार्थ्यांनी वाहतूक अडवून धरली आणि घोषणाबाजी केली. जिवती तालुक्यातील पाटागुडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक वारंवार गैरहजर राहतात. रजा मंजूर नसतानासुद्धा शाळेत येत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शाळेसमोर रास्ता रोको आंदोलन केले.
पाटागुडा शाळेतील शिक्षक नेहमीच गैरहजर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकटी जाधव यांनी गटविकास अधिकारी, शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याची आजवर दखल घेण्यात आली नाही. त्यामुळ विद्यार्थ्यांनी रास्तारोको आंदोलन केले . पोलीस पाटीलांनी टेकामांडवा उपपोलिस स्टेशनचे ठाणेदार मैसेकर यांना आंदोलनाची माहिती दिली. ठाणेदार यांनी आंदोलनस्थळ गाठून विद्यार्थ्यांची समजूत घातली. दोन दिवसांत शिक्षक शाळेत पाठवू अशी वरिष्ठांशी बोलणी करून दिल्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.


























































