
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील घाटकोपरच्या पश्चिम भागात चार्टर विमान कोसळून वैमानिकासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र असं असलं तरी अपघातात मृत्यू पावलेल्या वैमानिकाचं कौतुक होत आहे. कारण विमान कोसळणार हे लक्षात आल्यानंतर त्यानं प्रसंगावधान राखत ते विमान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर उतरवलं. अन्यथा मोठी जीवित आणि वित्तहानी झाली असती. मुख्य वैमानिक मारिया कुबेर आणि सहवैमानिक प्रदीप राजपूत अशी या वैमानिकांची नावं आहेत.
उत्तर प्रदेश सरकारनं विकलेलं एअर सी-९० प्रकारात मोडणाऱ्या एका विमानाची ट्रायल रन सुरू होती. यावेळी जुहू येथून या विमानानं उड्डाण केलं. पण त्यात काही बिघाड झाला म्हणून हे विमान तात्काळ खाली उतरवणं गरजेचं होतं. विमानाचं लँडिंग करताना हे विमान कोसळलं. मात्र असं असलं तरी वैमानिकानं प्रसंगावधान राखत विमान रहिवासी इमारतीवर न जाऊ देता मोकळी जागा दिसेल अशा ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. याच वेळी ते विमान सर्वादय रुग्णालय परिसरातील जीवदया लेनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या भागात कोसळलं. यामध्ये वैमानिकासह विमानातील चार जण ठार झाले. तर एका वाटसरूच्या अंगावर इंधन पडल्याने भाजून त्याचा मृत्यू झाला.
पण त्याच वेळी हे विमान रहिवासी इमारतीवर कोसळले असते तर त्यात शेकडो जीव मृत्यूमुखी पडले असते. वैमानिकाच्या एका निर्णयामुळे हे सारे टळले.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं
मुख्य वैमानिक- मारिया कुबेर
सह-वैमानिक- प्रदीप राजपूत
तंत्रज्ञ- मनिष पांडे
तंत्रज्ञ- सुरभी
वाटसरू- गोविंद पंडित
अपघातातील जखमींची नावं
लवकूश कुमार
नरेश कुमार




























































