छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हलच्या निमित्ताने शिवरायांच्या अत्यंत दुर्मिळ चित्रांचा खजिना शिवप्रेमींना पाहण्याची संधी पुढील तीन दिवस मिळणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून व वेध सामाजिक संस्थेमार्फत 2 ते 5 फेब्रुवारी या काळात छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल 2023 आयोजित केला आहे. या महोत्सवानिमित्त मैदानाच्या चारही बाजूला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. या कला महोत्सवात विविध कार्यक्रमही होतील. तर माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती मुंबईकरांना पाहता येतील. त्याशिवाय शिवकालीन शस्त्रास्त्रही शिवप्रेमींना बघता येतील. युवासेना कार्यकारिणी सदस्य व वेध संस्थेचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे यांनी हा कला महोत्सव आयोजित केला आहे.

दुर्मिळ चित्रांचा खजिना

या चित्रप्रदर्शनात शिवरायांची आठ अत्यंत दुर्मिळ छायाचित्रे आहेत. नेदरलँडमधील रिक्स म्युझियममधील 1680च्या काळातील अत्यंत दुर्मिळ चित्र आहे. या चित्रात ‘शिवाजी दख्खनचा राजा,  ज्यांचा मुलगा संभाजी आहे.  त्यांनी गोवळकोंडय़ाचा राजा सुलतान अबुहसन याच्या साम्राज्यावर चढाई केली’ असे डच भाषेत नमूद केले आहे. त्याशिवाय फ्रान्समधील राष्ट्रीय ग्रंथालयातील 1865च्या आसपासचे निकोलस मनुचीने काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे. पॅरिसच्या गिमे म्युझियमधील चित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये डच राजदूत हर्बट टी यागरने एका अज्ञात चित्रकाराकडून काढून घेतलेले शिवाजी महाराजांचे चित्र, बर्लिनमधील राष्ट्रीय ग्रंथालयातील एक चित्र असून दुसऱया महायुद्धात हिटलरच्या सैन्याने बऱयाच देशांमधील मौल्यवान वस्तू लुटल्या. यात शिवाजी महाराजांचे चित्र जर्मनीला गेले असण्याची शक्यता या सतराव्या शतकातील शिवरायांच्या चित्राबाबत वर्तवण्यात येत आहे. गोवळकोंडय़ातील अज्ञात चित्रकाराने काढलेले फ्रान्समधील राष्ट्रीय ग्रंथालयातील चित्राचा यामध्ये समावेश आहे.