98 वर्षांनंतर प्रथमच हिंदुस्थानात खेळवले जाणार चेस ऑलिंपियाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी बुद्धिबळाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया तामीळनाडूची राजधानी चेन्नई येथे यंदा 28 जुलैपासून 44 वे बुद्धिबळ ऑलिंपियाड खेळवले जाणार आहे. सुमारे 98 वर्षांनंतर अशा प्रकारची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा हिंदुस्थानात आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या या स्पर्धेत 187 देशांचे 343 बुद्धिबळ संघ आणि 2500 नामवंत बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. हिंदुस्थानचे 25 महिला आणि पुरुष बुद्धिबळपटू या स्पर्धेत आपला खेळ दाखवणार आहेत. एकूण 92 कोटी रुपये खर्चाच्या या स्पर्धेचे यजमानपद तामीळनाडूचे डीएमके सरकार भूषवणार आहे. रशिया आणि चीन या प्रबळ प्रतिस्पर्धी देशांच्या अनुपस्थितीत यजमान हिंदुस्थानला या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. पाच वेळा बुद्धिबळ जगज्जेतेपद पटकावणारा हिंदुस्थानचा विश्वनाथन आनंद हिंदुस्थानी बुद्धिबळ संघाचा मेंटॉर म्हणून स्पर्धेत दिसणार आहे.