पवार आणि तटकरे यांचे ‘नातेवाईक’ चालतात मग मीच काय घोडं मारलं!राज्यसभेसाठी डावलल्यामुळे भुजबळांची खदखद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रामध्ये काही जण राज्यसभा, लोकसभा सदस्य आहेत आणि राज्यात त्यांची मुलं किंवा कुटुंबीय मंत्रिपदावर आहेत. पवार आणि तटकरेंचे नातेवाईक चालतात, मग मीच काय घोडं मारलं, अशी खदखद अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी डावलल्याने व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर दिल्लीत जाण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र त्यांच्याऐवजी प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद आज माध्यमांसमोर व्यक्त केली. राज्यसभा आणि लोकसभेवर जाण्याची संधी आपणास चार ते पाच वेळा आली होती. पण दुर्दैवाने ती मिळाली नाही. यावेळीदेखील राज्यसभेवर जाण्याची संधी होती, पण तीदेखील मिळाली नाही. मकरंद पाटील मंत्री आणि त्यांचे भाऊ खासदार आहेत. सुनेत्रा पवार मंत्री, त्यांचे पुत्र जय खासदार, सुनील तटकरे यांचेही तसेच आहे. इतरांना जो न्याय तोच मला मलाही लागू करावा, अशी विनंती केली होती, असे भुजबळ म्हणाले. यावर पत्रकारांनी तुमच्यावर अन्याय झाला का, असा प्रश्न केला असता, अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल, कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे, असा टोला त्यांनी पक्षातील नेत्यांना लगावला.

राज्यसभेसाठी अजितदादा गटाच्या जैन यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी महायुतीकडून अजितदादा गटाच्या राजेंद्र जैन यांनी आपला अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. एका अपक्षाचा अर्ज दाखल झाला असून तो अवैध ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच जैन यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

भुजबळांच्या उमेदवारीत भाजपचाही खो?

छगन भुजबळ यांनी आपण राज्यसभेत खासदार झाल्यावर पुतणे समीर भुजबळ यांना महाराष्ट्रात मंत्री करण्याची मागणी केली होती. अजित पवार गटाकडून यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळी समीर भुजबळ यांच्या नावाचा विचार केला जाईल, असे सांगत भाजपने भुजबळांच्या राज्यसभेच्या उमेदवारीत खो घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांना ज्या पद्धतीचा न्याय मिळाला आहे, तोच न्याय मलाही मिळावा ही माझी रास्त अपेक्षा होती. मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही! – छगन भुजबळ