
मोदी सरकारच्या कारभाराविरोधात देशभरात असंतोष वाढत असतानाच राजधानी दिल्लीत आज इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. 23 पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीला उपस्थित राहत विरोधकांच्या भक्कम एकजुटीचा आवाज बुलंद केला. पेपरफुटी, महागाईपासून एसआयआरपर्यंत राष्ट्रहिताच्या पाच मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्यावर बैठकीत एकमत झाले. या माध्यमातून इंडिया आघाडीने एकप्रकारे ‘मिशन 2029’चा शंखच फुंकला.
दिल्लीतील कॉन्स्टिटय़ूशन क्लबमध्ये ही बैठक झाली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभाग घेतला व शिवसेनेची भूमिका मांडली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आदी नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करताना सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. त्यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘देशात संविधानावर हल्ले सुरूच आहेत. तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. देशाची आर्थिक स्थितीही चिंताजनक आहे, असे ते म्हणाले.
खरगेंनी दिली ‘त्या’ विजयाची आठवण
मोदी सरकारने आणलेले मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हाणून पाडत विरोधकांनी 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत भाजपचा पराभव केला होता. खरगे यांनी त्या विजयाची आठवण आपल्या भाषणात करून दिली. ‘भाजपचा पराभव करण्यासाठी आपण सर्वजण त्या दिवशी ठामपणे एकत्र आलो. ती एकजूट अत्यंत निर्णायक ठरली. तीच ऐक्याची भावना अधिक दृढ करून आपल्याला पुढे जायचे आहे, जेणेकरून मोदी सरकारच्या गैरकारभारामुळे देशासमोर निर्माण झालेली आव्हाने आपण पेलू शकू,’ असे खरगे म्हणाले.
1 एसआयआर, मतदार यादीतील घोळ आणि निष्पक्ष निवडणुकीसंबंधी सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार.
2 नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील घोळ हा लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
3 देशाची आर्थिक स्थिती, वाढती बेरोजगारी, महागाई, अत्याचार आणि शेतकऱयांच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी पेंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी.
4 दर दोन महिन्यांनी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांची बैठक होणार. पुढील बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबादमध्ये होईल.
5 पावसाळी अधिवेशन काळात इंडिया आघाडी समन्वयाने काम करणार. अधिवेशन काळात विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात दररोज बैठक होणार.
हे नेते होते उपस्थित
कॉन्स्टिटय़ूशन क्लबमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, राज्यसभा खासदार अॅड. कपिल सिब्बल, माकपचे डी. राजा, जॉन ब्रिटास, भाकप (माले)चे दीपांकर भट्टाचार्य, काँग्रेस नेते जयराम रमेश आदी नेते उपस्थित होते.




























































